कीव्ह ः युक्रेनची राजधानी कीव्हमधील इरपिन भागातील स्मशानाचे हे छायाचित्र. युद्धस्थितीमुळे येथे आगामी काही दिवसांतील दफनविधीचीही पूर्वतयारी केली गेली आहे. (एपी फोटो) 
Latest

Russia Ukraine War : आता रशियाचे लक्ष्य पूर्व युक्रेन

Arun Patil

कीव्ह/मॉस्को ; पीटीआय : रशियाच्या युक्रेनमधील (Russia Ukraine War) मोहिमेने आता नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे, असे वक्तव्य रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी एका मुलाखतीत केले आहे. रशिया युक्रेनमधील पूर्वभागातील औद्योगिक हब असलेल्या डोनबास भागात आक्रमक झाल्याचे युक्रेनने म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर लावरोव्ह यांनी हे वक्तव्य केले आहे.

लावरोव्ह म्हणाले की, युक्रेनमधील अभियान सुरूच आहे आणि आता त्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. रशियाच्या अभियानात आता लुहानस्क आणि डोनेटस्क या भागांच्या पूर्ण स्वातंत्र्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

रिझर्व्ह बँकेसोबत रशियाची चर्चा (Russia Ukraine War)

नवी दिल्ली : युद्धाबाबत भारताच्या भूमिकेचे स्वागत करताना रशियाच्या अधिकार्‍यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत (आरबीआय) पेमेंट सोल्युशनबाबत चर्चा सुरू केली आहे. पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे रशियाला व्यापारविषयक व्यवहार करताना अडचणी येत आहेत. त्यावर उपाय शोधण्याच्या द़ृष्टीने ही चर्चा सुरू आहे. काही उपाय द़ृष्टिपथात असून त्यातून भारतीय निर्यातीसही चालना मिळणार असल्याचे समजते.

पाश्चिमात्त्य देश युक्रेनला युद्ध करण्यास भाग पाडत आहेत : रशिया

पाश्चिमात्य देश युक्रेनला रशियासोबत युद्ध सुरू ठेवण्यास भाग पाडत आहेत, असा आरोप रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांनी केला आहे. अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी केलेल्या शस्त्रास्त्रांच्या मदतीमुळेच युक्रेन युद्ध सुरू ठेऊ शकला आहे, असेही ते म्हणाले.

खारकोव्हमध्ये हल्ल्यात 5 ठार

दरम्यान, रशियाने खारकोव्ह येथे केलेल्या हल्ल्यात 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. खारकोव्हचे गव्हर्नर ओलेह सिन्येहुबोव्ह यांनी ही माहिती दिली. रशियाने केलेल्या तोफगोळ्यांच्या मार्‍यात तसेच क्षेपणास्त्र हल्ल्यात 17 नागरिक जखमीही झाले आहेत. खारकोव्ह हे युक्रेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT