नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेणी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेच्या उभय सदनात शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे सकाळच्या सत्रातच राज्यसभेचे दिवसभराचे कामकाज गुंडाळण्यात आले तर लोकसभेचे कामकाज दोन वेळच्या तहकुबीनंतर अध्यक्षांना आवरावे लागले. टेणी यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सलग दुसऱ्या दिवशी संसदेचे कामकाज बाधित झाले आहे. (Teni's Resignation Issue)
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर कट रचून गाडी घालण्यात आली होती, असे ताशेरे या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने ओढले होते.
टेणी यांचा मुलगा आशिष हा सदर घटनेतला मुख्य आरोपी आहे.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी टेणी यांच्या राजीनाम्याची मागणी चालविली आहे.
लोकसभेत सकाळी ११ वाजता कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी टेणी तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वारंवार आवाहन करूनही गदारोळ थांबला नाही.
आक्रमक झालेले काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करीत होते.
गदारोळ न थांबल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज प्रथम दुपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केले.
गदारोळामुळे लोकसभेचे प्रश्नकाळ आणि शून्य काळाबरोबर इतर सर्व कामकाज वाया गेले.