मुंबई : वृत्तसंस्था : 'वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लॉगइन वापरून बनावट टीडीएस परतावे तयार करून ती रक्कम हडपण्याचा २६३ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून, याप्रकरणी एका आयकर कर्मचाऱ्यासह त्याच्या साथीदारांच्या मालमत्ता 'ईडी'ने छापे टाकत जप्त केल्या आहेत. यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३२ मालमत्ता आणि तीन महागड्या चारचाकींचा समावेश आहे.
'ईडी'ने जारी केलेल्या पत्रकात या घोटाळ्याची सविस्तर माहिती दिली असून, आयकर खात्यातील साधा कर्मचारी या साया घोटाळ्याचा सूत्रधार आहे. वरिष्ठ कर सहायक तानाजी मंडल अधिकारी असे त्याचे नाव असून, त्याने भूषण पाटील, राजेश शेट्टी, सारिका शेट्टी, कृती वर्मा आदी साथीदाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा केला आहे.
तानाजीने आयकर कार्यालयातील आपल्या वरिष्ठांचा विश्वास कमावला. कार्यालयीन कामासाठी लागणारे वरिष्ठांचे लॉगइन त्याने या विश्वासातूनच मिळवले. त्याने थेट आयकर आयुक्तांचाही लॉगइन मिळवला होता. यानंतर त्याने आपल्या साथीदारांना बनावट टीडीएस परतावे भरायला लावले. हे दावे वरिष्ठांचे लॉगइन वापरून तोच मार्गी लावायचा. भूषण पाटील याच्या एसबी एंटरप्रायझेस कंपनीच्या नावाने असलेल्या खात्यात ही रक्कम वळती केली जायची.
या रकमेबाबत बँकेला संशय आल्याने त्यांनी तशी सूचना दिल्यावर 'ईडी'ने तपास केला. त्यात हा भ्रष्टाचार उघडकीस आला. आधी 'ईडी'ने ती बँक खाती सील केली. त्यात ९६ कोटी रुपये होते. त्यानंतर आता बँक खाती आणि मालमत्ता मिळून १६६ कोटी रुपयांवर टाच आणली.
बनावट टीडीएस रिटर्नची प्रचंड रक्कम या सोनेरी टोळीने आपसात व्यवस्थित वाटून घेतल्याप्रमाणेच मार्गी लावली. काही रक्कम वैयक्तिक खात्यांत, तर काही रक्कम शेल कंपन्यांच्या खात्यांत वळवण्यात आली. या घोटाळ्यातून या सोनेरी टोळीने लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे आणि उडपी येथे मालमत्ता घेतल्या. तसेच पनवेल, मुंबईत फ्लॅट तसेच बीएमडब्ल्यू, मर्सिडिज आणि ऑडीसारख्या आलिशान कार खरेदी केल्या.
या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर 'ईडी'च्या पथकांनी छापे टाकत ३२ भूखंड, २ फ्लॅट्स, तीन कार जप्त केल्या. याप्रकरणी सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे, तर 'ईडी' ने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
अधिकारी याने सगळी जुळवाजुळव केल्यानंतर नोव्हेंबर २०१९ पासून हा घोटाळा सुरू केला. वेगवेगळ्या नावाने बनावट दावे दाखल करायचे आणि ही रक्कम आयकर खात्यातून अदा केली जायची.
बँकेत पैसे जमा झाले की, भूषण पाटील आणि त्याचे साथीदार त्या रकमेची पद्धतशीर विल्हेवाट लावायचे. ही रक्कम वैयक्तिक खात्यात वळती व्हायची किंवा शेल कंपनीच्या खात्यात जायची.
एकूण २६३ कोटी रुपये अशा बनावट टीडीएस परताव्यांपोटी त्यांनी गोळा केले. हे सारे बनावट रिफंड २००७-०८ आणि २००८-०९ या दोन वर्षांतील प्रलंबित असलेल्या प्रकरणांचे होते.