Latest

RR vs KKR : राजस्थानचा कोलकाताला धक्का

रणजित गायकवाड

मुंबई ; वृत्तसंस्था : जोस बटरलचे वादळी शतक आणि युजवेंद्र चहलने हॅट्ट्रिकसह घेतलेले पाच बळी अशा दुहेरी कामगिरीच्या जोरावर रोमांचकारी सामन्यात सोमवारी (RR vs KKR) राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सला 7 धावांनी पराभूत केले. उमेश यादवने 8 चेंडूंत 21 धावा करून सामना कोलकाताच्या बाजूने फिरवला होता. मात्र, ओबेद मकॉय याने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करून राजस्थानला रॉयल विजय मिळवून दिला. राजस्थानचे आता सहा सामन्यांतून 8 गुण झाले आहेत. कोलकाताचे सात सामन्यांतून सहा गुण झाले आहेत. आज त्यांना चौथा पराभव पत्करावा लागला.

विजयासाठी 218 धावांचे विशाल लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या कोलकाताची सुरुवात सनसनाटी झाली. पहिल्याच चेंडूवर सुनील नारायण धावबाद झाला. शिमरॉन हेटमायरने केलेल्या थ्रोने ही किमया साधली. मात्र त्यानंतर एरॉन फिंचने 58 तर कर्णधार श्रेयस अय्यरने 85 धावांची जबरदस्त खेळी करून सामन्यात रंग भरला. नंतर युजवेंद्र चहलने कोलकाताला लागोपाठ तीन धक्के दिले.

आयपीएलच्या या हंगामातील ही पहिलीच हॅट्ट्रिक होय. मग उमेश यादवने 21 धावांची स्फोटक खेळी करून सामना पुन्हा कोलकाताच्या बाजूने आणला. मात्र, त्याचे प्रयत्न अंतिमतः अपुरे ठरले. राजस्थानकडून ओबेद मकॉयने दोन, प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. (RR vs KKR)

त्यापूर्वी जोस बटलरने केलेल्या वादळी शतकाच्या (103) जोरावर राजस्थान रॉयल्सने 5 गड्यांच्या मोबदल्यात 217 धावांचा पर्वत उभारला. बटलरला तोलामोलाची साथ दिली ती दुसरा सलामीवीर देवदत्त पडिक्कल याने. या जोडीने कोलकाताच्या गोलंदाजीची कत्तल केली. अखेर सुनील नारायणने ही जमलेली जोडी फोडली ती पडिक्कलचा त्रिफळा उडवून. पडिक्कलने 24 धावांची छान खेळी केली. 18 चेंडूंचा सामना करताना त्याने तीन चौकार व दोन षटकार खेचले.

राजस्थानने 97 धावांची सणसणीत सलामी दिली. सुरुवातीपासून त्यांनी प्रतिषटक दहा धावांची गती राखली होती. कर्णधार संजू सॅमसनने 19 चेंडूंत 38 धावा फटकावल्या. त्याने 3 चौकार आणि दोन षटकार खेचले. करुण नायर, रियान पराग हे मात्र स्वस्तात बाद झाले. शिमरॉन हेटमायरने नंतर धमाल केली. केवळ 13 चेंडूंत त्याने 26 धावा चोपताना दोन चौकार व दोन षटकार लगावले. कोलकाताकडून सुनील नारायणने 2 तर शिवम मावी, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक गडी तंबूत पाठवला.

किमयागार चहल (RR vs KKR)

राजस्थानच्या विजयाचे श्रेय निःसंशयपणे युजवेंद्र चहलला द्यावे लागेल. त्याने सतराव्या षटकात लागोपाठ तीन चेंडूंवर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि धोकादायक पॅट कमिन्स यांना तंबूत पाठवले. यंदाच्या आयपीएलमधील पहिलीच हॅट्ट्रिक नोंदवून अशा प्रकारे चहलने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने कोलकाताचा निम्मा संघ गारद केला.

बटलरचा डबल धमाका

जोस बटलरला राजस्थान रॉयल्सने 10 कोटी रुपये मोजून खरेदी केले असून त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन शानदार शतके ठोकली आहेत. सोमवारच्या लढतीत त्याने 61 चेंडूंचा सामना करून 103 धावा कुटल्या. 9 चौकार आणि 5 षटकारांच्या या स्फोटक खेळीद्वारे त्याने कोलकाताच्या गोलंदाजीच्या चिधड्या उडवल्या. या आधी 2 एप्रिल रोजी बटलरने मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकाला गवसणी घातली होती. त्या खेळीत त्याने 69 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांची आतषबाजी करून रसिकांच्या टाळ्या मिळवल्या होत्या. बटलरच्या खेळीमुळे तो सामना राजस्थानने 23 धावांनी जिंकला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT