Latest

RR vs DC : राजस्थानसमोर दिल्ली चारीमुंड्या चीत

Shambhuraj Pachindre

गुवाहाटी; वृत्तसंस्था : यशस्वी जैस्वाल व जोस बटलर या दोन्ही सलामीवीरांनी तडाखेबंद फलंदाजी साकारल्यानंतर राजस्थान रॉयल्सने आयपीएल साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला चारीमुंड्या चीत केले. प्रारंभी, राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 199 धावांची जोरदार मजल मारली. प्रत्युत्तरात दिल्लीला विजयापासून कित्येक कोस दूर राहावे लागले. त्यांना निर्धारित 20 षटकांत विजयासाठी 200 धावांचे आव्हान असताना दिल्लीतर्फे कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 55 चेंडूंत 7 चौकारांसह सर्वाधिक 65 धावांचे योगदान दिले. मात्र, पृथ्वी शॉ व मनीष पांडे अगदी खातेही न उघडता बाद झाले. याचा दिल्लीला फटका बसला. मधल्या फळीत रिली रॉस्यूने 14, तर ललित यादवने 24 चेंडूंत 5 चौकारांसह 38 धावा जमवल्या. त्यानंतर अक्षर पटेल (2), रोव्हमन पॉवेल (2), अभिषेक पोरेल (7), कुलदीप यादव (2), नोर्‍त्झे (0) ठराविक अंतराने बाद होत राहिले आणि अंतिमत: दिल्लीला 20 षटकांत 9 बाद 142 धावांवर समाधान मानावे लागले. (RR vs DC)

जैस्वाल, बटलरची फटकेबाजी

प्रारंभी, यशस्वी जैस्वाल व जोस बटलरची तडाखेबंद फलंदाजी हे राजस्थानच्या डावाचे ठळक वैशिष्ट्य ठरले. जैस्वालने 31 चेंडूंत 11 चौकार, 1 षटकारासह 60; तर बटलरने 51 चेंडूंत 11 चौकार, 1 षटकारासह 79 धावांचे योगदान दिले. या जोडीने 8.3 षटकांत 98 धावांची तडाखेबंद सलामी दिली. मधल्या फळीत संजू सॅमसन 0 व रियान पराग 7 स्वस्तात बाद झाले. मात्र, शिमरॉन हेटमायरने चौफेर फटकेबाजी करत 21 चेंडूंत 1 चौकार, 4 षटकारांसह जलद 39 धावा फटकावल्या. याच धावसंख्येवर तो नाबाद राहिला. ध—ुव जुरेलने 3 चेंडूंत नाबाद 8 धावा केल्या.

दिल्लीतर्फे मुकेश कुमारने 36 धावांत 2 बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादव व रोवमन पॉवेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अन्य गोलंदाजांची पाटी मात्र कोरीच राहिली.

या सामन्यात 57 धावांनी मिळवलेल्या दमदार विजयामुळे राजस्थानची धाव सरासरी सुधारली असून, याचा निर्णायक टप्प्यात त्यांना लाभ होऊ शकतो. राजस्थानने या लढतीत एकीकडे प्रारंभी जोरदार फटकेबाजी करत मोमेंटम आपल्याकडे कायम राहील, याची दक्षता घेतली; तर दुसरीकडे दिल्लीचे दोन फलंदाज अगदी स्वस्तात बाद करत त्यांच्या आव्हानातील जणू हवाच काढून घेतली.

दिल्लीला 9 बाद 142 धावांवर रोखण्यात बोल्ट व चहल यांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरले. ट्रेंट बोल्टने 4 षटकांत 29 धावांत 3 बळी घेतले; तर चहलनेदेखील 4 षटकांत 27 धावांत 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 4 षटकांत 25 धावांत 2 फलंदाज बाद केले. विजयासाठी 200 धावांचे आव्हान असताना या संघाने अगदी खाते उघडण्यापूर्वीच पहिले दोन फलंदाज गमावले होते. या धक्क्यातून हा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही.

रिली रॉस्यू तिसर्‍या गड्याच्या रूपाने बाद झाला, त्यावेळी दिल्लीला फक्त 36 धावांपर्यंत मजल मारता आली होती. पुढे ही हाराकिरी अशीच कायम राहिली आणि यानंतर दिल्ली किती धावांनी पराभूत होणार, इतकीच औपचारिकता बाकी होती.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT