Latest

PBKS vs RCB : विराटच्या नेतृत्वाला यश, आरसीबीचा पंजाबवर 24 धावांनी विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना जिंकून पुन्हा एकदा विजयीपथावर मार्गक्रमण करण्यात यश मिळवले आजे. चंदीगड येथील पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियमवर टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 4 बाद 174 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 18.2 षटकात षटकात 150 धावांवर ऑलआऊट झाला. याचबरोबर आरसीबीने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 24 धावांनी सामना खिशात घातला.

तत्पूर्वी, विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांनी आरसीबीसाठी 137 धावांची शानदार भागीदारी केली. या दोघांनी एकूण 97 चेंडूंचा सामना केला. मात्र, ही जोडी बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या इतर फलंदाजांणा झटपट धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे आरसीबीचा संघ 200 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. पंजाबच्या सॅम करण आणि अर्शदीप सिंग यांनी प्रभावी मारा करून आरसीबीच्या फलंदाजांना वेसण घातली आणि मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने दोन आणि अर्शदीप, नॅथन एलिसने प्रत्येकी एक बळी घेतला.

प्रत्युत्तरात पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. 3.2 षटकात 27 धावांवर संघाच्या तीन महत्त्वाच्या विकेट पडल्या. यानंतर प्रभसिमरन सिंग (46) याने एक टोकाकडून चिवट फलंदाजी केली. पण पंजाबचा निम्मा संघ 76 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर शेवटी जितेश शर्माने 27 चेंडूत 41 धावांची खेळी करत पंजाबच्या आशा उंचावल्या. या दोन फलंदाजांशिवाय हरप्रीत ब्रारने 13 धावांची तिसरी सर्वोच्च खेळी केली. पंजाबच्या इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही आणि मोहम्मद सिराजच्या माऱ्यासमोर पंजाबच्या फलंदाजांनी गुढघे टेकले.

आरसीबीकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भेदक मारा केला. त्याने 4 षटकात केवळ 21 धावा देत 4 बळी घेतले. हसरंगाला दोन, वेन पारनेल आणि हर्षल पटेलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. आरसीबीचा हा स्पर्धेतील तिसरा विजय आहे तर पंजाबला तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

शिखर धवन अनफिट असल्यामुळे पंजाबचे नेतृत्व सॅम कुरनकडे होते. त्याचवेळी आरसीबीचा संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला. नियमित कर्णधार फाफ डुप्लेसी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला होता.

आरसीबीची गुणतालिकेत झेप

या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघ पाच पैकी तीन विजय मिळवून पाचव्या स्थानावर होता तर आरसीबी पाच पैकी तीन सामने गमावून आठव्या स्थानावर होता. मात्र या विजयानंतर आरसीबीचा संघ 6 सामन्यांत 6 गुणांसह पाचव्या स्थानावर आला आहे. तर तिसर्‍या पराभवानंतर पंजाब संघ 7 व्या स्थानावर घसरला आहे. या यादीत राजस्थान अव्वल स्थानावर आहे आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आपले पहिले पाच सामने गमावून शेवटच्या स्थानावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT