Latest

RCB vs DC IPL : आरसीबीचा दिल्ली कॅपिटल्सवर 23 धावांनी विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : RCB vs DC IPL :आयपीएलच्या आजच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. त्याचवेळी दिल्लीला सलग पाचव्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ केवळ 151 धावा करू शकला आणि सामना 23 धावांनी गमावला.

दिल्लीचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

दिल्लीचा निम्मा संघ 53 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अभिषेक पोरेल आठ चेंडूत पाच धावा करून बाद झाला. हर्षल पटेलने त्याला वेन पारनेलकरवी झेलबाद केले.

दिल्लीची चौथी विकेट

दिल्ली कॅपिटल्सची चौथी विकेट 30 धावांवर पडली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर 13 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. विजयकुमारने त्याला विराट कोहली करवी झेलबाद केले. विजयकुमारची आयपीएलमधील ही पहिली विकेट ठरली.

दिल्लीची तिसरी विकेट पडली

दोन धावांवर दिल्ली कॅपिटल्सची तिसरी विकेट पडली. यश धुल चार चेंडूत एक धाव घेऊन बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले.

दिल्लीची दुसरी विकेट

दिल्ली संघाने एक धावेवर दोन विकेट गमावल्या आहेत. पृथ्वी शॉनंतर मिचेल मार्शही खाते न उघडताच बाद झाला. त्याने चार चेंडूंचा सामना केला आणि विराट कोहलीच्या हाती वेन पारनेलकरवी झेलबाद झाला. गेल्या चार सामन्यांप्रमाणेच वॉर्नरशिवाय दिल्लीची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा अपयशी ठरत आहे. दोन षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात दोन होती.

दिल्लीची पहिली विकेट

175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ खाते न उघडताच बाद झाला आहे. त्याने दोन चेंडूंचा सामना केला आणि त्याला अनुज रावतने अचूक थ्रो मारून धावबाद केले.

बेंगलोरकडून विराट कोहलीने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याचवेळी महिपाल लोमररने 26 आणि ग्लेन मॅक्सवेलने 24 धावा केल्या. शाहबाज अहमदने शेवटी चांगली खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्श आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन बळी घेतले. अक्षर पटेल आणि ललित यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

आरसीबीच्या डावात काय घडले?

टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबी संघाची सुरुवात चांगली झाली. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी 28 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. 16 चेंडूत 22 धावा करून प्लेसिस मिचेल मार्शचा बळी ठरला. अमन हकीम खानने अप्रतिम झेल घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर विराटनेही महिपाल लोमरोरसोबत 47 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 89 धावांपर्यंत नेली. दरम्यान, त्याने 33 चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले, मात्र पुढच्याच चेंडूवर तो यश धुलकरवी झेलबाद झाला. कोहलीला ललित यादवचा एक फुल टॉस बॉल सिक्स मारायचा होता पण बाऊंड्री लाइनवर त्याचा झेल पकडला गेला.

कोहली बाद झाल्यानंतर ग्लेन मॅकइलवेलने महिलपाल लोमरोरसह संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. लोमररने 13व्या षटकात मिचेल मार्शला षटकार ठोकला, पण पुढच्याच चेंडूवर तो यष्टिरक्षक अभिषेक पोरेलकडे झेलबाद झाला. त्याने 18 चेंडूत 26 धावा केल्या. तो बाद होताच आरसीबीची मधली फळी गडगडली. पाचव्या क्रमांकावर आलेला हर्षल पटेल चार चेंडूत सहा धावा करून पुढच्याच षटकात बाद झाला. पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल बाद झाला. त्याने 14 चेंडूत 24 धावा केल्या. दिनेश कार्तिकही पहिल्याच चेंडूवर ललित यादवकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

कुलदीप यादवने लागोपाठ दोन चेंडूत विकेट्स घेतल्या मात्र त्याला हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नाही. आरसीबीने 132 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. या धावसंख्येवर संघाच्या तीन विकेट पडल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात या संघाला वेगवान धावा करता आल्या नाहीत. मात्र, शाहबाज अहमदने अनुज रावतसोबत उपयुक्त भागीदारी केली आणि 42 धावा जोडल्या. त्यामुळे आरसीबी संघाला सहा गडी गमावून 174 धावा करता आल्या.

शाहबाज अहमदने 12 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या, पण अनुज रावत 22 चेंडूत 15 धावाच करू शकला. दिल्लीकडून कुलदीप यादव आणि मिचेल मार्शने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेल आणि ललित यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ :

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख.

दिल्ली कॅपिटल्स संघ :

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, एनरिच नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT