पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Record Break Century : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरातील पहिल्या कसोटीत शतक झळकावून इतिहास रचला. तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. तर अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा खेळाडू आहे. रोहितच्या आशी श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, द. आफ्रिकेचा फाफ डुप्लेसिस आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांनी कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत.
रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 171 चेंडूत शंभर धावा पूर्ण केल्या. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील 9वे, मायदेशातील 8वे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले शतक ठरले. रोहितपूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, परंतु त्यांना आपल्या कार्यकाळात सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आले नाही. (Rohit Sharma Record Break Century)
रोहित 9 डिसेंबर 2014 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याने या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 14 कसोटी डाव खेळले. मात्र त्याला शतक झळकावता आले नाही. पण 15व्या कसोटी डावात 2985 दिवसांनंतर शतकी खेळी साकारली.
रोहितने भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावण्यात माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांना मागे टाकले. कपिल देव यांनी 131 कसोटीत आठ शतके झळकावली आहेत. हिटमॅनने नववे शतक झळकावून माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांची बरोबरी केली आहे. गंभीरने 58 आणि सिद्धूने 51 कसोटीत प्रत्येकी नऊ शतके झळकावली आहेत. (Rohit Sharma Record Break Century)
या शतकासह, सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत रोहित चौथ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला (42) मागे टाकले. रोहितच्या खात्यात आता एकूण 43 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. या यादीत विराट कोहली 74 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 45 शतकांसह दुस-या, तर इंग्लंडचा जो रुट 44 शतकांसह तिस-या क्रमांकावर आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीवीर म्हणून नऊ शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध तेवढीच शतके फटकावली होती. पण रोहितला इथपर्यंत पोहोचण्यासाठी 49 डाव खेळावे लागले, तर सचिन तेंडुलकरला 62 डावांची वाट पाहावी लागली होती. म्हणजेच या बाबतीत रोहित आणि सचिन बरोबरीवर आले आहेत. आणखी एक शतक झळकावताच हिटमॅन मास्टर-ब्लास्टरला मागे टाकेल.
दरम्यान, रोहितने सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटच्या पहिल्या 31 डावांमध्ये सलामी देणाऱ्या रोहितच्या नावावर आता सहा शतके जमा झाली आहेत. यापूर्वी गावसकर आणि सेहवाग यांनी प्रत्येकी पाच शतके झळकावली होती.
असे म्हणतात की विक्रम हे फक्त तोडण्यासाठीच बनतात, पण काही विक्रम असे असतात जे मोडणे अशक्य नसले तरी खूप अवघड असते. असाच एक विक्रम रोहित शर्माने केला आहे. रोहित शर्मा आता भारतात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 षटकार पूर्ण केले. पहिल्या 5 खेळाडूंमध्ये रोहितशिवाय आणखी एक सक्रिय खेळाडू आहे, बाकीचे सर्व निवृत्त झाले आहेत. रोहित शर्माच्या 250 षटकारांनंतर एमएस धोनीचे नाव येते, ज्याच्याच्या बॅटमधून 186 षटकार आले आहेत. त्याखालोखाल विराट कोहली आहे, ज्याच्या नावावर 137 षटकार आहेत. तर युवराज सिंगने 113 षटकार तर वीरेंद्र सेहवागने 111 षटकार मारले आहेत.
हिटमॅनचे हे 250 षटकार टेस्ट, टी-20 आणि वन-डे अशा तिन्ही फॉरमॅटमधील आहेत. रोहित शर्मा आणखी काही वर्षे क्रिकेट खेळेल. विराट कोहलीही खेळेल, पण दोघांमधील षटकारांचा फरक खूप मोठा आहे. रोहित मोठ्या षटकार मारण्यासाठी ओळखला जातो, परंतु विराटच्या बाबतीत असे मानले जात नाही. तो अधिकाधिक ग्राउंड स्ट्रोक खेळतो आणि चौकारांवर भर देतो. त्यामुळे रोहितचा हा षटकारांचा विक्रम मोडेणे तसे अवघडच मानावे लागेल.
रोहित शर्माच्या एकूण षटकारांबद्दल बोलायचे झाले तर त्याची संख्या 519 वर पोहोचली आहे. तसे, या प्रकरणात वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 553 षटकार आहेत. ख्रिस गेलने एकूण 483 सामने खेळले असून रोहितच्या नावावर 434 सामने आहेत. जर हिटमॅनने गेलच्या बरोबरीचे सामने खेळले तर तो जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय षटकारांच्या बाबतीत पुढे जाईल हे नक्की.