अमरावती ; पुढारी वृत्तसेवा : अमरावती काँग्रेसचे पदाधिकारी रोहित अजय देशमुख (२७) यांच्या वाहनाला अपघात झाला. या दुर्घटनेत राेहित देशमुख हे जागीच ठार झाले. सोबत असलेले पाचजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त हाेत आहे.
अकोला येथे युवक काँग्रेसचा कार्यक्रम हाेता. ताे आटपून अमरावतीला परत येणाऱ्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनाला दर्यापूर लागत आराळा येथे रात्री १२.३० वाजता ट्रकने धडक दिली. ही धडक एवढी भीषण हाेती की, अजय देशमुख (२७) हे जागीच ठार झाले.
या अपघातात रोहित देशमुख यांच्यासोबत कारमध्ये असणारे युवक काँग्रेसचे पदाधिकारी वैभव देशमुख, चांदुर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा मुलगा परीक्षित जगताप, युवक काँग्रेसचे मेळघाट विधानसभा अध्यक्ष पंकज मोरे आणि वाहनचालक जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रोहीत देशमुख हे माजी खासदार के.जी. देशमुख यांचे नातू होत. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे ते कट्टर समर्थक होते. रोहित यांचे वडील अजय देशमुख हे टाकरखेडा संभुचे माजी सरपंच होते. आज ( रविवारी) सायंकाळी रुख्मिणी नगर परिसरातील निवासस्थानावरून सायंकाळी ५ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. रोहितच्या मृत्यूमुळे देशमुख कुटुंबियांसह शहर आणि जिल्हा काँग्रेस वर शोककळा पसरली आहे.