Latest

रॉकफेलर, बेंजामिन आणि राजा!

backup backup

जीवनात सुख-समृद्धी हवी असेल, तर लोक 'थेंबे थेंबे तळे साचे' या तत्त्वाचा अंगीकार करतात आणि पैसा कमावतात. जे बचतीच्या नवनव्या कल्पना अंमलात आणतात, ते श्रीमंत होतात. ज्ञानप्राप्तीचेही अगदी तसेच. कोणतेही ज्ञान असो, ते केव्हाही नाशिवंत नसते. शालेय जीवनापासूनच तुमचे अवांतर वाचन आणि अर्जित केलेले ज्ञान तुम्हाला नोकरी, व्यवसाय आणि व्यापार-उद्योगात परिस्थितीनुरूप वापरता येते. एकदा हे ज्ञान अर्जित केले, तर छोट्या-छोट्या गोष्टींतून मोठमोठी कामे होतात.

विसाव्या शतकातील विश्वविख्यात कुबेर श्री रॉकफेलर एकदा आपल्या तेल कारखान्यात फिरत होते. एका यंत्रापाशी ते थांबले. हे यंत्र तेलाच्या पिंपाची झाकणे सील करण्याचे काम करीत होते. त्यासाठी यंत्रातून प्रत्येक झाकणासाठी 40 थेंब रसायन वापरले जात होते. त्यांना ते थोडेसे जास्त वाटले म्हणून त्यांनी फोरमनला बोलावले व झाकण बंद करण्यासाठी नेमकी किती थेंबांची गरज आहे, असे विचारले. त्याला नीट सांगता आले नाही. रॉकफेलर यांनी स्वतः अभ्यास करून 39 थेंबांत हे काम होऊ शकेल, असा निष्कर्ष काढला आणि यापुढे झाकण बंद करण्यासाठी 39 थेंब रसायन वापरण्याचा आदेश त्यांनी दिला. या एका थेंबाच्या बचतीतून कारखान्याचे दरवर्षी 8 लाख रुपये वाचू लागले.

बाबा कैलासनाथ एक सत्पुरुष होते. आपल्या गावात एक देऊळ बांधावे, असे त्यांना वाटले. गावातील प्रत्येक माणसाकडून त्यांनी मदत म्हणून एकेक रुपया गोळा केला आणि या पैशातून त्यांनी मंदिर बांधले. ते देवालय 'एक रुपया देवालय' म्हणून प्रसिद्ध आहे. या पद्धतीने त्यांनी 'दोन रुपये देवालय' बांधून काढले. अशी ही बचत आणि त्यातून अर्जित केलेल्या ज्ञानाची किमया.

एकदा पंडित मदनमोहन मालवीय बनारस विद्यापीठासाठी देणगी मागण्यासाठी एका श्रीमंत शेटजीकडे गेले. त्याचवेळी ते शेटजी आपल्या धाकट्या मुलाला माचीसमधील काड्या वाया घालवण्यावरून रागावत होते. हा कंजूष गृहस्थ आपणास काय मदत देणार? असा विचार श्री मालवीय यांच्या मनात आला. जेव्हा त्या गृहस्थाने काय काम आहे? म्हणून विचारले तेव्हा भीत भीत मालवीय म्हणाले, "बनारस विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आपणाकडून काही देणगी घ्यावी म्हणून आलो होतो. पुन्हा कधीतरी येईन" थांबा, असे म्हणत शेटजींनी आपल्या मुलाला चेकबुक आणावयास सांगितले. तत्काळ त्यांनी 5 हजार रुपयांचा धनादेश मालवीय यांच्या हातात दिला. त्यांची ती उदार देणगी पाहून पंडित मदनमोहन मालवीय यांना राहवले नाही व त्यांनी शेटजींना विचारले, "रागाऊ नका! आपण आताच आपल्या मुलाला साधी काडी वाया घालवण्यावरून रागावत होता. चेक देण्याची आपली कृती पूर्वीच्या वर्तनाशी विसंगत नाही का?" शेटजी हसत हसत उद्गारले, काटकसर हा चिक्कूपणा नव्हे, तर योग्य कारणासाठी योग्य ठिकाणी योग्य पैसा खर्च करणे." पंडित मदनमोहन मालवीय त्यांच्याकडे बघतच राहिले. त्या दिवशी आयुष्यातील एक फार मोठा धडा ते शिकले. क्षुल्लक गोष्टीतून पूर्णत्व प्राप्त होते, जे कधीच क्षुल्लक नसते. पैशाचे रक्षण केले, तर तो आपले रक्षण करतो. अर्थो रक्षति रक्षित:।

पंडित मदनमोहन मालवीय यांनी अशाच बचतीच्या पैशांतून उभारलेले बनारस विश्वविद्यालय नावारूपास आले आणि ते जगविख्यात बनले. या बचतीच्या पैशांतून अखंड ज्ञानाचा निर्झर आजही या विद्यापीठातून खळाळून वाहत आहे.
बेंजामिन फ्रँकलिनच्या दुकानासमोर एक मनुष्य बराच वेळ फालतू चौकशी करत हिंडत होता. शेवटी त्याने विचारले, या पुस्तकाची किंमत काय?
विक्रेता म्हणाला, "आहे एक डॉलर; पण तुम्हाला पडतील दोन डॉलर."
"तुझ्या मालकाला बोलव. मी त्याची भेट घेऊ इच्छितो."
फ्रँकलिन आपले काम सोडून आले. ग्राहकाने विचारले, "आपण हे पुस्तक कमीत कमी केवढ्याला द्याल?"
"तीन डॉलर!"
"पण आताच आपल्या नोकराने किंमत दोन डॉलर सांगितली."
"बरोबर आहे. आपण त्याचा जो वेळ घेता त्याचा त्याने एक डॉलर जास्त सांगितला. माझा जो वेळ तुम्ही घेतला त्याबद्दल आणखी एक डॉलर."
तो तरुण काय समजायचे ते समजला. वेळ किंवा पैसा विनाकारण खर्च करणे म्हणजे दिलेले जीवन व्यर्थ घालविणे होय.

छोट्या-छोट्या गोष्टींतून मोठमोठी कार्ये होतात. अति सूक्ष्म अणूपासून महासंहारक परमाणुबॉम्ब बनतो. एकदा एक राजा बुद्धिबळ खेळत होता. एक शेतकरी त्याच्याकडे मदत मागायला आला. राजा त्याला म्हणाला, "बोल किती पैसे देऊ?" तो चतुर शेतकरी म्हणाला, "बुद्धिबळाच्या पहिल्या घरावर एक रुपया, दुसर्‍या घरावर त्याच्या दुप्पट आणि तिसर्‍या घरावर दुसर्‍याच्या दुप्पट, अशा क्रमाने 64 घरांवर पैसे ठेवा व मला द्या." राजाला वाटले काय किरकोळ मागणी आहे? राजाने प्रत्येक घरावर पैसे ठेवायला सुरुवात केली आणि हा हा म्हणता राजाचा सारा खजिना रिकामा झाला, तरीही तो त्या शेतकर्‍याची मागणी पूर्ण करू शकला नाही.

– देविदास लांजेवार 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT