Latest

कोल्हापूर : बालिंग्यात ज्वेलर्सवर दरोडेखोरांचा गोळीबार

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरापासून सात किलोमीटरवर असलेल्या कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावरील बालिंगा (ता. करवीर) येथील वर्दळीच्या मध्यवर्ती चौकातील कात्यायनी ज्वेलर्स या सराफी पेढीवर सराईत टोळीने गुरुवारी भरदिवसा दरोडा घातला. सशस्त्र दरोडेखोरांनी सराफी पेढीच्या मालकासह त्यांच्या मेहुण्यावर अंदाधुंद गोळीबार करून दोन कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. यामध्ये तीन किलो सोन्याच्या तयार दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय एक लाख 80 हजारांची रोकडही लंपास केली.

या गोळीबारात सराफी व्यावसायिक मालक रमेश शंकर माळी (वय 45) व त्यांचे मेहुणे जितू मोड्याजी माळी (35, रा. कळंबा, करवीर) हे गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी रमेश माळी व जितू माळी यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. रमेश यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे तर जितू माळी यांच्या कंबरेजवळ गोळी आरपार झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. जखमींना तत्काळ कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरोड्याच्या थरारनाट्यानंतर दुचाकीवरून पळून जाणार्‍या दरोडेखोरांनी बालिंगा येथील मध्यवर्ती चौक व कळे मार्गावर सैरभैर गोळीबार करीत प्रचंड दहशत माजविली. त्यांचा पाठलाग करणार्‍या ग्रामस्थांच्या दिशेने रिव्हॉल्व्हर रोखले.

कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात यामुळे खळबळ उडाली आहे. सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवरही सोमवारी (दि. 5) भर दिवसा दरोडा टाकून दरोडेखोरांनी 22 किलो सोन्यासह चांदी, हिर्‍यांचे दागिने असे 15 कोटी रुपयांचे दागिने लुटले होते. या दरोड्यावेळीही दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. या घटनेतील आरोपी जेरबंद होण्यापूर्वीच दरोडेखोरांनी बालिंगा येथे भरदिवसा गोळीबार करून दागिने लुटले. अवघ्या चार दिवसांत घडलेल्या घटनांनी पोलिस यंत्रणा हादरून गेली आहे; तर सराफी व्यावसायिकांतही प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.

कोल्हापूर-गगनबावडा महामार्गावर, कोल्हापूरपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बालिंगा येथील सतत गजबजलेल्या मध्यवर्ती चौकात भरदिवसा गोळीबार करून दरोड्याचा प्रकार घडल्याने शहर व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

दरोडेखोरांनी प्रतिकाराचा प्रयत्न करणार्‍या सराफी पेढीच्या मालकासह मेहुण्यावर तीन, सोन्याचे विविध नमुन्याचे दागिने ठेवलेल्या शोकेसच्या दिशेने एक तर दुकानाबाहेर पाच फुटाच्या अंतरावरून प्रवेशद्वाराच्या दिशेने काचेवर एक अशा पाच गोळ्या झाडल्या आहेत. दरोड्याच्या घटनेनंतर दुचाकीवरून पळ काढताना मार्गावर सात ते आठ ठिकाणी गोळीबार केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. घटनास्थळासह दुकानाच्या आवारात एकूण सहा रिकाम्या पुंगळ्या पोलिसांना मिळाल्या आहेत.

प्राथमिक चौकशीत दरोडेखोरांची संख्या चार असावी, असा निष्कर्ष आहे. तिघांनी दुकानात प्रवेश केला होता. तर एकजण दुकानाबाहेर टेहळणी करीत असावा, असे सांगण्यात येत असले तरी दरोडेखोराची संख्या पाचपेक्षा जादा असावी, असा वरिष्ठ अधिकार्‍यांचा अंदाज आहे. दरोडेखोर आपापसात मराठी व हिंदीत संभाषण करीत होते. सराफी पेढीच्या मालकासह त्यांच्या मेहुण्याला दरडावताना त्यांनी दोन्ही भाषेचा वापर केला. त्यामुळे म्होरक्यासह साथीदार आंतरराज्य टोळीतील असावेत व यामध्ये एका माहितीगाराचा समावेश असावा, असाही पोलिस अधिकार्‍यांना संशय आहे.

मूळचे राजस्थानातील सराफी व्यावसायिक रमेश माळी कुटुंबीयांसमवेत 20 वर्षांपूर्वी बालिंगा येथे वास्तव्याला आले. दोन वर्षांपूर्वी माळी यांनी बालिंगा येथील मुख्य रस्त्यावर कात्यायनी ज्वेलर्स ही सराफी पेढी सुरू केली. रमेश यांच्या मदतीसाठी त्यांचे मेहुणे जितू माळी दुकानात असतात. गुरुवारी सकाळपासून रमेश, त्यांचा मुलगा पीयूष आणि मेहुणे जितू दुकानात होते.

दुचाकी पार्क करून दरोडेखोर दुकानात घुसले

गुरुवारी दुपारी दोन वाजता लाल रंगाच्या दुचाकीवरून 25 ते 30 वयोगटातील चौघेजण कोल्हापूरकडून दुकानासमोर येऊन काही काळ थांबले. दुचाकी पार्क केल्यानंतर काळ्या रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची जीन पँट घातलेले दोन संशयित दुकानात शिरले. पाठोपाठ तिसरा संशयित तोंडाला काळा रूमाल बांधून दुकानात घुसला.

पिस्तुलाच्या मुठीने हल्ला

टोळीच्या म्होरक्याने कॅश बॉक्सलगत खुर्चीवर बसलेल्या रमेश माळी याच्या डोक्यावर पिस्तुलाच्या मुठीने प्रहार केला. त्यावेळी माळी यांच्यासह जितू यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला. अन्य दोघांनी जितूला फरफटत आणून मारहाण केली.

गोळीबार, हल्ल्यामुळे मुलगा पीयूष भेदरला

झटापट झाल्याने एका दरोडेखोराने जितूवर गोळ्या झाडल्या तर अन्य दोन दरोडेखोरांनी बेसबॉल स्टिकने रमेश माळी यांच्यावर हल्ला चढविला. गोळीबाराचा आवाज आणि वडिलांवर होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे पीयूष प्रचंड घाबरला. जीवाच्या आकांताने तोे दुकानातील छोट्या केबिनमध्ये पळाला. भीतीपोटी त्याने खोलीला आतून कडी लावून घेतली.

सराफी पेढीत थरार… मालकाच्या दिशेने गोळ्या झाडल्या

विविध नमुन्यांचे सोन्याचे दागिने ठेवलेल्या शोकेस किल्ल्याची दरोडेखोरांनी माळी यांच्याकडे मागणी केली. त्यांनी नकार देताच शोकेसवर गोळ्या झाडल्या. तिघापैकी एका दरोडेखोराने अवघ्या काही मिनिटांत शोकेसमधील दागिन्यांचे 40 बॉक्स पांढर्‍या रंगाच्या पिशवीत भरले. एकाने कॅश बॉक्समधील रोकड हिसकावून घेतली. हा प्रकार सुरू असतानाही माळी दरोडेखोरांशी प्रतिकार करीत होते. अखेर दरोडेखोराने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी माळी यांच्या डोक्याला चाटून गेल्याने त्यांना डोक्याला इजा झाली.

दोघे जखमी; एक चिंताजनक

दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले रमेशसह मेहुणे जितू यांना ग्रामस्थांनी तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी जितू माळी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे बालिंग्यासह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. घटनास्थळी झालेल्या गर्दीने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती.

सहा रिकाम्या पुंगळ्या हस्तगत; दुकानात रक्ताचा सडा

दरोडेखोरांनी दुकानासह परिसरात तसेच महामार्गावर केलेल्या बेछूट गोळीबारामुळे भीतीचे सावट होते. पोलिसांनी दुकानातून चार तर दुकान परिसर व मार्गावर दोन अशा सहा रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. गोळीबार व बेसबॉल स्टिकने केलेल्या हल्ल्यामुळे दुकानात रक्ताचा सडा पडलेला होता.

अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलिस निरीक्षक संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, करवीरचे निरीक्षक प्रवीण काळे, सहायक निरीक्षक सुरज बनसोडे आदींनी घटनास्थळाची पहाणी केली. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके विविध मार्गावर रवाना करण्यात आली आहेत.

दरोडेखोरांनी केली रेकी

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने दरोडेखोरांनी रेकी करून दरोड्याचा कट रचला असावा, असा पोलिस अधिकार्‍यांना संशय आहे. दरोड्यानंतर कळेच्या दिशेने पळून जाताना पाठलाग होणार ही शक्यता गृहित धरूनच केवळ दहशत माजविण्याच्या हेतूनेच दरोडेखोरांनी गोळीबार केला असावा, असा अंदाज पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरातील व्यावसायिक चिंताग्रस्त

सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडेखोरांनी भरदिवसा दरोडा टाकून 15 कोटी रुपयांचे सोने लुटले होते. या घटनेमुळे सांगलीसह कोल्हापुरातही गुजरीसह उद्योग, व्यापार व्यावसायिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले होते. सांगलीतील दरोड्याचा तपास लागण्यापूर्वीच बालिंगा येथे गुरुवारी भरदिवसा कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा टाकून टोळीने दागिने, रोकड असा दोन कोटीचा ऐवज लंपास केला. तसेच बेछूट गोळीबार करून दोघा सराफी व्यावसायिकांना गंभीर जखमी केले. यामुळे कोल्हापूरसह परिसरातील गुजरीसह उद्योग, व्यापार व्यावसायिक चिंताग्रस्त आहेत.

पोलिसांची गस्त बंद

करवीर पोलिस ठाण्यांतर्गत बहुतांशी गावात पोलिसांची गस्त हा नेहमीच वादाचा विषय असतो. करवीर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अलीकडच्या काळात घरफोडी, चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यापैकही एकाही गुन्ह्याचा पोलिसांना तपास लावता आलेला नाही. पोलिसांची गस्त काही काळापासून बंद असल्याचा आरोप बालिंगा ग्रामस्थांनी केला.

लोकांच्या दिशेने बेछूट गोळीबार : बालिंग्याच्या हमरस्त्यावरील ते सराफी दुकान… भर दुपारी दोनची वेळ… फटाक्यांच्या आवाजासारखा पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांचा आवाज… त्यामुळे शेजार्‍यांनी व दुकानाच्या मागील गल्लीतील नागरिकांनीही त्याकडे फारसे लक्ष दिलेले नसावे. पण सराफी दुकानातून दोन दरोडेखोर हातात पिस्तूल घेऊन बाहेर पडले. या दरोडेखोरांनी रस्त्यावर थांबलेल्या व सराफी दुकानाकडे पाहणार्‍या लोकांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच लोक भयभीत झाले व सुरक्षित स्थळी त्यांनी आसरा घेतला. त्याचवेळी गोळीबार करत दरोडखोर दोनवडेच्या दिशेने गेलेे. रस्त्यावरील तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू करताच दरोडेखोरांनी पुन्हा गोळीबार सुरू केला. त्यामुळे तरुणांना मागेच थांबावे लागले. या संधीचा फायदा घेत दरोडखोर दुचाकीवरून पळून गेले.

सहा ठिकाणी गोळीबार

सराफी पेढीच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असलेले थरारनाट्य परिसरातील शेकडो नागरिक पाहात होते. नागरिक पाठलाग करतील, या भीतीने दरोडेखोराने दुचाकीवरून पळून जाताना मुख्य चौकात दोनवेळा हवेत गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळापासून भोगावती नदीवरील पुलापर्यंत दरोडेखोरांनी वाटेत 6 ठिकाणी गोळीबार केला.

आठ मिनिटांचा थरार

रमेश माळी व जितू माळी यांनी पूर्ण ताकदीनिशी सशस्त्र दरोडेखोरांबरोबर तीन ते चार मिनिटे प्रतिकार केला. यावेळी हेल्मेटधारी दरोडेखोराने जितू माळी यांच्या दिशेने गोळ्या झाडताच मोठा आवाज झाला. या आवाजामुळे काही महिला दुकानाच्या दिशेने धावत आल्या. याच काळात म्होरक्याने अन्य दोन साथीदारांना 'चला चला, लवकर आवरा' असे मराठीत सांगितले. त्यानंतर दोन-तीन मिनिटांतच रमेश माळी यांच्या दिशेने गोळी झाडून दागिने त्यांनी पिशवीत भरले. दुकानात प्रवेश केल्यापासून आठव्या मिनिटाला दुपारी 2 वाजून 8 मिनिटांनी दरोडेखोर ऐवजासह बाहेर पडले. हा सारा थरार आठ मिनिटांत घडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT