पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज इतिहास घडविला. चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथम चांद्रयान उतरवणारा देश अशी भारताची ओळख झाली आहे. या ऐतिहासिक यशाच्या शिल्पकारांमध्ये रॉकेट वूमन अशी ओळख असणार्या डॉ. रितू करिधाल ( Ritu Karidhal ) यांचा समावेश आहे. जाणून घेवूया रॉकेट वूमन डॉ. रितू करिधल यांच्याविषयी…
डॉ. रितू करिधाल या मूळच्या लखनौमधील. त्यांचा जन्म १९७५ मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लखनौतील नवयुग गर्ल्स कॉलेजमधून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. लहानपणापासूनच रितू यांना चंद्र-तारे आणि अवकाश अभ्यासात विशेष आवड होती. इस्रो आणि नासाशी संबंधित वर्तमानपत्रातील लेख, माहिती आणि छायाचित्रे गोळा करणे हा त्यांचा छंद होता. उच्च शिक्षणासाठी लखनौ विद्यापीठात प्रवेश घेतला. येथे त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी आणि नंतर पदव्युत्तर शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी GATE उर्त्तीण होवून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस (IISc) बंगळुरूमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी एरोस्पेस इंजिनीअरिंगची पदवी घेतली.
रितू करिधाल यांची १९९७ मध्ये इस्रोमध्ये निवड झाली. 'रॉकेट वुमन' म्हणून ओळखल्या डॉ. रितू करिधल यांच्यावर इस्रोने चांद्रयान-3 उतरवण्याची जबाबदारी सोपवली. त्या चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रकल्प संचालक ( मिशन डायरेक्टर) होत्या. यापूर्वी डॉ. रितू मंगळयान प्रकल्पात उप प्रकल्प संचालक तर चांद्रयान-2 मोहिमत प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले आहे.
इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. रितू या मंगळयानचे उप प्रकल्प संचालक आणि चांद्रयान-2 मध्ये प्रकल्प संचालक होत्या.
आई-वडिलांच्या निधनानंतर रितू यांनी लहान भावंडांचा सांभाळ केला. मिशन चांद्रयान-2 लाँच करताना त्यांचा भाऊ रोहित म्हणाला होता की, आम्हाला आमच्या बहिणीचा अभिमान आहे. रितू वैयक्तिक आयुष्यात पारंपारिक आहेत तर तेवढ्याच इस्त्रोतील कार्यात व्यावसायिक आहेत.