Latest

सागर किनारे कमी होण्याचा धोका

backup backup

केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयांतर्गत नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च (एनसीसीआर) च्या एका अहवालाने सागरी किनार्‍याबाबत इशारा दिला आहे. जमीन खचण्यामुळे आणि अन्य कारणांमुळे किनारे कमी होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कालांतराने ही बाब पर्यावरण, सामाजिक आणि उपजीविकांवर संकट निर्माण करणारी आहे. जेव्हा एखादा समुद्रकिनारा खचतो तेव्हा त्याच्या काठावर राहणारे मच्छीमार, शेतकरी, वस्त्यांच्या अस्तित्वावर संकट निर्माण होते. सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे, ज्या ठिकाणी समुद्रात नद्या येऊन मिसळतात, तेथेच खचण्याचे प्रमाण अधिक आहे.

परिणामी, नद्यांची स्थिती आणखीच बिकट होऊ शकते. ओडिशाच्या सहा जिल्ह्यांत बालासोर, भद्रक, गंजम, जगतसिंहपूर, पुरी आणि केंद्रपाडाचा सुमारे 480 किलोमीटरचा किनारा खचण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या हवामान बदल कार्य योजना 2021-2030) मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ओडिशात 36.9 टक्के किनारे वेगाने समुद्रापासूनच खचून वेगळे होत आहेत. बंगालमधील स्थिती सर्वात भयानक आहे. तिरुअनंतपूरमच्या केरळ विद्यापीठाच्या अभ्यासात म्हटले की, तिरुअनंतपूरम जिल्ह्यात पेदियम आणि अचुन्थंग यांच्यातला 2.62 चौरस किलोमीटरचा भाग हा गेल्या 14 वर्षांत समुद्रात बुडाला. मात्र, या अभ्यासात असेही म्हटले की, या काळात समुद्राच्या प्रवाहाने 700 मीटर नवीन जमीनदेखील तयार झाली.

पर्यावरण आणि वन तसेच हवामान बदल मंत्रालयांतर्गत काम करणार्‍या चेन्नईच्या नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटच्या आकडेवारीनुसार, देशाला एकूण 6,907 किलोमीटरची किनारपट्टी लाभली असून, त्यात 28 वर्षांत प्रत्येक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारची हानी झाली आहे. पश्चिम बंगालला 534.45 किलोमीटरचा किनारा लाभला आणि त्यात 60.5 टक्के म्हणजेच 323.07 किलोमीटरचा भाग खचल्याचे आढळून आले आहे. देशाला सर्वाधिक समुद्रकिनारा गुजरातला मिळाला आहे. तो 1,945.60 किलोमीटरचा आहे. त्या ठिकाणीही 537.50 किलोमीटरचा भाग खचला. आंध— प्रदेशचा 1,027.58 किलोमीटरपैकी 294, तामिळनाडूचा 991.47 किलोमीटर पैकी 422.94 किलोमीटरचा भाग खचला किंवा कमी झाला आहे.

एकेकाळी पुद्दुचेरी हे सर्वांगसुंदर किनार्‍यासाठी प्रसिद्ध होते. तेदेखील आपले किनारे गमवत आहे. एकीकडे वाढणारे बांधकाम आणि दुसरीकडे समुद्राची वाढती व्याप्ती या कारणांमुळे किनार्‍यांचे सौंदर्य पुस्तकात पाहावे लागते की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. या ठिकाणी केवळ 41.66 किलोमीटरची किनारपट्टी आहे. त्यापैकी निम्मी म्हणजे, 56.2 टक्के खचली आहे. दमन, दिवसारख्या लहान बेटांचा 34.6 टक्के भाग खचला आहे. केरळच्या 592.96 किलोमीटर किनार्‍यापैकी 56.2 टक्के भाग हळूहळू कमी होत आहे.
महाराष्ट्रातदेखील समुद्र खचण्याचे प्रमाण वाढत आहे. कोस्टल रिसर्च सेंटरने 98 ठिकाणे निश्चित केली असून, तेथे खचण्याचे प्रमाण अधिक आहे. यापैकी तामिळनाडूत 28, पश्चिम बंगालमध्ये 16 आणि सात ठिकाणे आंध—ात आहेत. साधारणत:, एक दशकापूर्वी कर्नाटकच्या सिंचन विभागाच्या एका अहवालात म्हटले की, लाटांची दिशा बदलण्यास अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

त्यापैकी सर्वात मोठे कारण म्हणजे, किनारपट्टीवर वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे किनारपट्टीवर हिरवळ गायब होणे. शिवाय, वार्‍याची दिशा, नद्यांच्या प्रवाहात होणारा बदल, भरतीमुळे समुद्राच्या स्थितीवर परिणाम होत आहे. याव्यतिरिक्त भौगोलिक परिस्थितीदेखील समुद्राला अस्थिर करत आहे. जसे की नद्या आणि समुद्र यांच्यातील संगमाचे ठिकाण आणि तेथे तयार झालेल्या वेगवेगळ्या खाड्या, नदीच्या उगमाच्या ठिकाणी होणारा बदल या गोष्टीमुळे समुद्र खवळण्याचे प्रमाण वाढले आहे. ओझोनचा थर नष्ट होणे आणि वातावरणात कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने पृथ्वी अधिकाधिक उष्ण होत आहे. परिणामी, समुद्राची पातळी वाढत असून, त्यामुळे किनारे नष्ट होऊ शकतात. समुद्र विस्ताराची समस्या केवळ ग्रामीण भागापुरतीच मर्यादित नाही, तर त्याचा सर्वाधिक परिणाम हा किनार्‍यावरच्या महानगरांवर होत आहे.

– मेघना ठक्कर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT