पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी नवी दिल्ली येथे आजपासून (दि.९ सप्टेंबर) G20 शिखर परिषदेला प्रारंभ झाला आहे. या परिषदेत २८ देश सहभागी झाले आहेत. भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे देखील त्याची पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासोबत परिषदेसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, ऋषी सुनक यांनी 'G20′ मध्ये ते का सहभागी झाले आहेत?' या प्रश्नाचे उत्तर देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Rishi Sunak in G20 Summit)
ऋषी सुनक यांनी 'G20' परिषदेतील प्राधान्यक्रमांची रूपरेषा सांगताना व्हिडिओत म्हटले आहे की, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे कसे काम करणे आवश्यक आहे. 'G20' आणि यांसारख्या शिखर परिषदांमुळे इतर देशांच्या नेत्यांशी समोरासमोर बोलण्याची आणि त्या समस्यांचे निराकरण करण्याची एक अनोखी संधी मिळते. आम्ही घेतलेले निर्णय ब्रिटिश नागरिकांना अपेक्षित असलेल्या नोकऱ्या वाढ आणि सुरक्षितता प्रदान करतील, असेही सुनक यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. (Rishi Sunak in G20 Summit)
'मी G20 मध्ये का आहे?' या शीर्षकाच्या व्हिडिओमध्ये ऋषी सुनक यांनी भारतात पोहचल्यापासूनचा त्यांच्या प्रवास अधोरेखित केला आहे. यामध्ये ते शुक्रवारी (दि.०८) आपली पत्नी अक्षता मूर्तीसह नवी दिल्लीत पोहोचल्यानंतरचे क्षण टिपले आहेत. ऋषी यांची पत्नी अक्षता मूर्तीही इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या आहे. मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटवर ऋषी सुनक यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते काही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. दिल्लीत पोहोचल्यानंतर ऋषी सुनक यांनी ब्रिटिश कौन्सिललाही भेट दिली. (Rishi Sunak in G20 Summit)
ऋषी सुनक यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांचा स्वत:चा आवाज आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'खरं सांगायचं तर जागतिक समस्या महत्त्वाच्या आहेत. आपण एकटे काहीही करू शकत नाही. यासाठी जगातील देशांना एकत्र काम करावं लागेल, हे काेराेना महामारीच्या काळात आपण पाहिलं आहे. आपण हवामान बदलासोबतच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या बेकायदेशीर युद्धाशी लढण्यासाठी एकत्र या…' असे आवाहन देखील सुनक यांनी केले आहे. (Rishi Sunak in G20 Summit)