पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात बारावीच्या निकालात सामान्य मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 91.25 टक्के आहे. तर मुलींची टक्केवारी 93.73 टक्के आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी मात्र सामान्य मुलांपेक्षा वरचढ कामगिरी करत 93.43 टक्केवारी गाठली आहे. त्यामुळे बारावीच्या निकालात या विद्यार्थ्यांनी 'हमभी किसीसे कम नही' असा संदेश दिला आहे. या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या निर्णयानुसार सर्व सोयीसुविधा दिल्या होत्या, अशी माहिती मंडळाने दिली.
यंदा परीक्षेसाठी एकूण 6 हजार 113 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6 हजार 72 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. यातील 5 हजार 673 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, या निकालातदेखील मुलींनी बाजी मारली असून, त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.22 टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण 92.96 टक्के आहे, अशी माहिती मंडळाने दिली आहे.
सर्वाधिक 1 हजार 499 विद्यार्थ्यांनी लोकोमोटर डिसॅबिलिटी प्रवर्गातून परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 1 हजार 394 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी 93.62 टक्के आहे. त्यानंतर ब्लाइंडनेस गटातून 1 हजार 47 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली, त्यापैकी 980 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण 93.96 टक्के आहे. हिअरिंग इंपेरमेंट गटातून 950 विद्यार्थ्यांनी
परीक्षेसाठी नोंदणी केली, त्यापैकी 894 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
हे प्रमाण 94.40 टक्के आहे. मंडळाने विद्यार्थ्यांची एकूण 22 दिव्यांग प्रकारच्या गटात परीक्षा घेतली. यातील 3 प्रकारातील विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे, तर 17 प्रकारातील विद्यार्थ्यांचा निकाल 90 टक्क्यांहून अधिक लागला आहे. त्यामुळे यंदाच्या निकालातदेखील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.