Latest

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्जा आला पुन्हा घरी..! पंचवीस दिवसांनंतर बैलाला दरीतून बाहेर काढण्यात यश

अमृता चौगुले

खडकवासला, पुढारी वृत्तसेवा: सिंहगड किल्ल्याच्या परिसरातील रांजणे येथील डोंगररांगेतील खोल दरीत 25 दिवसांपासून अडकून पडलेल्या मुक्या जिवाला खडतर परिश्रमानंतर अखेर सोमवारी जीवनदान मिळाले. जखमी अवस्थेत दुर्गम दरीत खितपत पडलेल्या सर्जा नावाच्या बैलाचा जीव वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करणार्‍या शेतकर्‍यांची अखेर दिवाळी गोड झाली.

लोणावळा येथील अ‍ॅनिमल रेस्क्यू टीएमने प्राणाची बाजी लावत सायंकाळी पाचच्या सुमारास सर्जाला दोरखंडाने बांधून कड्या-कपारीतून बाहेर काढले आणि सर्जाचे मालक शेतकरी विजय मारुती शेंडकर (रा. दापोडे, ता. वेल्हे) आणि त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. सर्जा रानात चरत चरत उंच डोंगरावर गेला आणि तेथून शेजारच्या रांजणे गावच्या हद्दीत एक हजार फूट खोल दरीत कोसळला होता. सुरुवातीला दोन आठवडे सर्जाचा शोध लागला नाही. त्यानंतर रांजणे येथील एका मेंढपाळाला चोहोबाजूंनी घनदाट जंगल असलेल्या निर्जन दरीत बैल खितपत अवस्थेत दिसला. याबाबत माहिती मिळताच शेंडकर यांनी डोंगरावर धाव घेतली. बैल पडलेल्या ठिकाणी जाण्यासाठी पाऊल वाटा अथवा कोणत्याही रानवाट नसल्याने घनदाट जंगलातील दरीत पोहोचण्यासाठी शेंडकर आटापिटा करत होते.

पोटच्या मुलाप्रमाणे संभाळ केलेल्या मुक्या जीवाचे प्राण वाचावेत म्हणून अक्षरशः टाहो फोडत दरीत दोर बांधून काही ग्रामस्थांसह शेंडकर सर्जाजवळ पोहोचले. पाय व अंगावर गंभीर जखमा झाल्याने सर्जाला चालताही येत नव्हते. दोर बांधून खोल दरीत चढ -उतार करत शेंडकर बैलाला दररोज चारा, पाणी देत होते. शेंडकर यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरकडून औषधे घेऊन बैलावर प्राथमिक उपचार केले. त्यामुळे बैलाच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाली. मात्र, तेथून बाहेर काढण्यासाठी शेंडकर व ग्रामस्थांचा संघर्ष सुरू होता.
ऐन दिवाळीत शेंडकर हे ग्रामस्थांसह सर्जाला दरीतून बाहेर काढण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते. दोराने बांधूनही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्जाला बाहेर काढता आले नाही. याची माहिती रांजणे येथील राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दारवटकर यांना समजल्यानंतर त्यांनी तालुका तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आदींशी संपर्क केला. त्यानंतर लोणावळा येथील 'अ‍ॅनिमल रेस्क्यू टीम'च्या पथकाने रविवारी (दि. 23) सायंकाळी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अंधार झाल्यामुळे त्यांना मदतकार्य थांबवावे लागले.

सोमवारी सकाळपासून पुन्हा सर्जाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. रेस्क्यू टीएमचे डॉ. चेतन वंजारी, सुमेध तरडे, नरेश चांडक, श्रेयस दुधगावकर, हर्षद नगरे, विकास सिंद आदींसह स्थानिक कार्यकर्ते संतोष शेंडकर, शिवाजी शेंडकर, सुनील शेंडकर, नीलेश शेंडकर, संदीप शेंडकर, दौलत शेंडकर, सोन्या मरळ, अण्णा धुळे, पंकज शिवतरे, दादा शेंडकर, दशरथ यादव आदींनी प्राणाची बाजी लावून अखेर सर्जाला बाहेर काढले.

सर्जाचा जीव वाचवण्याचे प्रयत्न संपले, असे वाटत होते. मात्र, रेस्क्यू टीमच्या मावळ्यांनी सर्जाला जीवनदान दिले. खोल दरीत उतरणेही धोक्याचे होते. मुक्या जनावरांना बोलता येत नाही. गंभीर जखमी अवस्थेत चारा, पाण्याअभावी खितपत पडलेल्या सर्जाच्या डोळ्यांचे भाव पाहून माझे मन कासावीस झाले होते. अखेर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्जा घरी आल्याने आम्हाला दिवाळीचा खरा आनंद मिळाला.
– विजय शेंडकर, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT