पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ रविवारी (दि. 23) झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल तयार झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीची आज 2 मे रोजी बैठक होणार आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली.
डॉ. देशमुख म्हणाले, 'नवले पुलाजवळ होत असलेल्या अपघाताची कारणे आणि त्याअनुषंगाने उपाययोजना सुचविण्याबाबत 'सेव्ह लाइफ फाउंडेशन' या संस्थेला काम देण्यात आले होते. या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बर्याच ठिकाणी रम्बल स्ट्रिप्स (वाहनांचे वेग कमी करण्यासाठी अडथळे) लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, दोन्ही बाजूस पट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढविणे, वेग मर्यादेवर नियंत्रण करणे आदी उपायोजना केल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणालादेखील (नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) याबाबत सूचना देण्यात आल्या असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने काम करण्यात येत आहे.'