Latest

‘४२ लेकरांचं हत्याकांड : गावीत बहिणींच्‍या क्रूरतेने हादरला हाेता महाराष्‍ट्र

backup backup

अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन : गुन्हेगारीच्या इतिहासात अंगावर काटा आणणारी आणि अनेक आयांच्या काळजाच्या थरकाप उडवणारी घटना म्हणजे नव्वदीच्या दशकात घडलेलं बालहत्याकांड प्रकरण. (Murder Mystery) यामध्ये अंजना गावित, तिच्या मुली रेणुका गावित आणि सीमा गावित या तिघींनी क्रूरतेचा इतिहास घडवला. एक नाही, दोन नाही, तीन नाही… तर तब्बल ४२ लेकरांनी निर्घृतेनं हत्या या तिघींनी केली हाेती.  तान्ह्या लेकराला रडताना पाहून आई नसणाऱ्या स्त्रीलाही पान्हा फुटतो, तिथं तान्ही लेकरं बघितली की, या तीन स्त्रीयांच्या काळजाचं दगड होताना या महाराष्ट्रानं पाहिलंय. ज 'नव्वदीचं बालहत्याकांड : गावित नावाच्या तीन स्त्रीयांची क्रूरता', हे प्रकरणं नेमकं काय आहे, हे पाहूया…

पहिल्या बाळाची हत्या कोल्हापुराच!!!

एका ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडून अंजना कोल्हापुरला आली. त्या ड्रायव्हरनेच तिला सोडून दिली. त्याच्याकडून तिला रेणुका नावाची मुलगी झाली होती. नंतर अंजना ही मोहन गावित नावाच्या निवृत्त सैनिकांच्या प्रेमात पडली. तिनं लग्न केलं. त्याच्याकडून तिला सीमा नावाची मुलगी झाली. या मोहन गावितनेदेखील अंजनाला सोडून दिलं. अंजना रस्त्यावर आली. पदरात पडलेल्या दोन मुलींना सांभाळण्यासाठी अंजनाने कष्टाच्या नाही तर, पाकिट चोरीचा मार्ग स्वीकारला.

अंजना दोन मुलींना घेऊन ती गर्दीच्या ठिकाणी जायची. लोकांचं पाकिट चोरायची. त्या पैशांतून अंजना आणि तिच्या दोन्ही मुली जगू लागल्या. पण, चोरी पकडली जाण्याची शक्यता जास्त होती. गर्दीचा मार बसण्याची भीतीही त्यांच्या मनात होती. त्यामुळे तिघींनी मिळून एक प्लॅन केला. अंजना, रेणुका आणि सीमा या तिघींनी ५ वर्षांच्या आतील मुलं चोरायची आणि त्यांना सोबत घेऊन लोकांच्या पाकिट आणि बायकांच्या पर्स चोरायच्या. लोकांच्या लहान मुलांवरील दयेपणाचा फायदा घेऊन चोरी करणे, हा त्यांचा प्लॅन ठरला.

प्लॅनप्रमाणे अंजनाने एक झोपडपट्टीतल्या संतोष नावाच्या केवळ १८ महिन्यांच्या बाळाचं अपहरण केलं. त्याला कडेवर घेऊन एका मंदिराच्या ठिकाणी चोरी करायला गेली. बाळाचा आधार घेऊन एका व्यक्तीचं पाकिट चोरताना मात्र ती सापडली. लोकांनी अंजनाला पकडलं आणि मारायला सुरूवात केली. कडेवरचं बाळं गर्दीला घाबरून जोरजोरात रडू लागलं. अंजना लोकांना सांगू लागली की, "या लेकराची शपथ मी चोरी केली नाही."

गर्दीमध्ये बायकाही होत्या, त्यांनीही अंजनाला मारायला सुरूवात केली. शेवटी अंजनाने आपल्या कडेवरचं ते लेकरू जमिनीवर जोरात फेकून दिलं. त्यात बाळाच्या डोक्यातून रक्त्याच्या चिळकांड्या उडाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लेकराला पाहून गर्दीला दया आली आणि अंजनाला सोडून दिलं. ती त्या लेकराला घेऊन घरी गेली आणि अशाप्रकारे ती चोरी अंजनाने पचवली.

पण, पुढे झालं काय? तर जखमी असलेल्या त्या लेकराने टाहो फोडायला सुरूवात केली.त्याच्या  रडण्यामुळे पुन्हा आपण पोलिसांच्या तावडीत सापडू, या भीतीने त्या १८ महिन्यांच्या लेकराची हत्या करण्याचा या तिघींना प्लॅन केला. या तिघींनी एका निर्जन स्थळी लेकराला घेऊन आल्या. त्याच्या पायाला धरून एका विजेच्या खांबावर पूर्ण ताकदीनिशी जोरजोरात आपटायला सुरूवात केली. अखेर १८ महिनांच्या संतोष शांत झाला. त्याचा मृतदेह कोल्हापूर बसस्थानकाच्या एका कोपऱ्या सापडला. आख्खं शहर धास्तावलं. अशाप्रकारे अंजना आणि तिच्या मुलींनी चोरीही पचवली आणि लेकराची हत्याची पचवली.

लेकरांच्या हत्या करण्याचं सूत्र झालं सुरु…

५ वर्षांच्या आतील लेकरांचा चोरी करायची. लोकांच्या संवदेशशीलतेचा उपयोग करून घ्यायचा. अशा चोरीतून पैसे मिळवायचे आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा. शेवटी त्या लेकराची निर्घृण हत्या करायची, हे पैसे मिळविण्याचं  सूत्र अंजना, रेणुका आणि सीमा गावित यांनी सुरु केले. शहरात लहान लेकरं गायब होऊ लागली. त्यांच्या हत्येच्या घटना समोर येऊ लागल्या. काेल्‍हापूर शहर आणखीच धास्तावलं.

अंजना आणि तिच्या लेकी ज्या लेकरांचं अपहरण करायच्या ती लेकरं झोपडपट्टीतील आणि गोरगरिबांची लेकरं होती. कारण, ही माणसांच्या मनात पोलिसांची भीती, त्यामुळे तक्रार करण्याच्या फंदात ते पडत नसतं आणि त्याच्याच फायदा या तिघी उचलायच्या. चोरी करून झाली की, लेकरांना विजेच्या खांबावर किंवा जमिनीवर आपटून आपटून मारून टाकायच्या. नाही तर, लेकरांच्या पायाला धरून त्यांचं मुंडकं पाण्यात बुडवून गुदमरून मारायच्या.

त्याचा वापर करून एक मोठी चोरीसुद्धा केली. त्या लेकराची हत्या केली आणि त्या मृत लेकराला प्लॅस्टिकच्या पिशवीत घातलं. त्याला कुठंतरी टाकून द्यायचं, असा विचार होता. मात्र, चोरी केलेल्या पैशांतून आधी एखादा पिक्चर बघावा म्हणून कोल्हापुरातील उषा टाॅकीजमध्ये गेले. त्यांच्या हातात मृत लेकरू असणारी प्लॅस्टिकची पिशवी होती. पिक्चर बघितला. आता ही पिशवी टाकायची कुठं म्हणून त्यांची उषा टाॅकीजच्या बाथरूममध्ये टाकून दिली. आणि त्या फरार झाल्या. रक्तानं माखलेलं ते प्लॅस्टिकच्या पिशवीतील लेकरू लोकांच्या लक्षात आलं. तेव्हा आख्खं कोल्हापूर शहर हादरलं हाेतं.

बालहत्याकांडचं बिंग कसं फुटलं?

अंजना, रेणुका आणि सीमा गावित यांनी फक्त कोल्हापुरातच नव्हे, तर सांगली, सातारा, पुणे, मुंबई या शहरांतही हत्याकांडचं सत्र सुरूच ठेवलं. त्या हत्याकांडमध्ये एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल ४२ लेकरांची क्रूरपणे हत्या केली. पण, यांच्या पोलिसांच्या हाती हा तिघी सापडल्या नाहीत. अर्थात पोलिसांच्या तपासाचा वेगही मंदच होता.

अंजनाचा दुसरा पती मोहन गावितने अंजनानंतर प्रतिमा नावाच्या स्त्रीशी लग्न केलेलं होतं. तिला क्रांती नावाची मुलगी झाली होती. काही काळानंतर अंजना आपल्या दोन्ही मुलींना घेऊन मोहनकडे राहायला आल्या. मात्र, काही दिवसांनंतर प्रतिमा आणि अंजना यांच्या धुसमूस सुरू झाली. शेवटी प्रतिमाला धडा शिकवण्यासाठी अंजनाने प्रतिमाच्या मुलीची म्हणजेच क्रांतीची हत्या करण्याचा प्लॅन केला.

अंजना, रेणुका आणि सीमा या तिघींनी ९ वर्षांच्या लहानग्या क्रांतीचं अपहरण केलं. तिची हत्या केली आणि जवळच्या उसाच्या शेतातच तिचा मृतदेह फेकून दिला. प्रतिमाने पोलिसांत तक्रार दिली. त्यात अंजना आणि तिच्या लेकींच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या लक्षात आल्या. त्यांना अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच तिघींना क्रांतीच्या हत्येची कबुली दिली.

यातून ९० ते ९६ दरम्यान झालेल्या बालहत्याकांडचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पण, पोलिसांना म्हणावा तसा पुरावा सापडला नव्हता. पण, हे सगळं घडत असताना अंजनाची मोठी मुलगी रेणुकाचं लग्न किरण शिंदे नावाच्या तरूणाशी झालेलं होतं. त्याच्याकडून रेणुकाला लेकरही झालेली होती. रेणुकाला माफीचा साक्षीदार करावं म्हणून पोलिसांनी रेणुकाला तिच्या फायद्याचं गणित समजावून सांगितलं.आणि इथंच पती किरण शिंदेच्या मदतीने रेणुकाने पोलिसांना ४२ लेकरांचं अपहरण, त्यांचा वापर करून केलेल्या चोऱ्या आणि नंतर त्या लेकरांची क्रूरपणे केलेली हत्या… हे सगळं पोलिसांसमोर सांगून टाकलं, अशा पद्धतीनं नव्वदीतल्या बालहत्याकांडचं बिंग फुटलं.

सीआयडीच्या तपासात १३ लेकरांचे अपहरण आणि ६ लेकरांची हत्या सिद्ध झाल्या.  उच्च न्यायालयाने या तिघींना फाशीची शिक्षा सुनावली; पण, १९९८ साली अंजना गावितचा मृत्यू झाला. तरीही सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने फाशी कायम ठेवली. इतकंच नाही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला. पण, तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी अर्ज फेटाळत फाशी कायम ठेवली हाेती.

फाशीची शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर फासावर चढवण्यास सरकारला अपयश आले. याचा फायदा घेत या भगिनीनी उच्च न्यायालयात फाशीची शिक्षा रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती. उच्‍च न्‍यायालयाने ही विनंत मान्‍य करत गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करत त्‍यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

ह्या सीरियल किलरच्या स्टोरीज वाचल्या का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT