रेंट ए बाईक किंवा कार चालविणार्या व्यक्तीने केलेल्या अपघातात कुणाचा मृत्यू झाला, तर रेंट ए बाईक, कारच्या मालकालाही अटक करण्यात येणार. असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला. त्यासाठी वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (Goa News ) मंगळवारी पणजीत कदंब महामंडळाच्या ४३ व्या वर्धापदिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, आमदार उल्हास नाईक तुयेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. (Goa News)
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये रेंट बाईक, कार चालवणार्या पर्यटकांच्या धिंगाण्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. असे चालक अपघात करून पळून जातात. काही वेळेस त्यांनी योग्य कागदपत्रे दिली नसतानाही त्यांना बाईक किंवा कार दिली जाते. मात्र यापुढे मालकांनाही याची जबाबदारी घ्यावी लागेल. म्हणूनच सरकार सदर चालकासह मालकांवरही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहोत. कारण आमच्यासाठी सामान्य लोकांची सुरक्षा ही जास्त महत्त्वाची आहे. ती देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.