बाणेर : औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यासंदर्भात चतु:शृंगी वाहतूक विभाग व औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण एरिया सभेच्या वतीने वाहतूक कोंडी उपाययोजनेसाठी रविवारी बैठक घेण्यात आली.
या वेळी वाहतूक विभागाला विविध सोसायट्यांतील उपस्थित नागरिकांनी काही सूचना केल्या. या क्षेत्रीय बैठकीत आपापल्या भागात वाहतूक कोंडी होण्यामागच्या कारणांची चर्चा करण्यात आली.
त्यामध्ये बालेवाडी हाय स्ट्रीट येथे रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांमुळे, पाषाण येथील बालाजी चौक, बाणेर-बालेवाडी फाटा गणेश मंदिर चौक, बाणेर रोड क्रोमासमोर, बालेवाडी ममता चौक, तसेच शाळा सुटण्याच्या वेळेस विविध शाळेसमोर होणार्या वाहतूक कोंडी आदी ठिकाणावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सोसायटीतील नागरिकांसमवेत चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये बालेवाडी हाय स्ट्रीट येथे नो- पार्किंगमधील वाहनांवर सतत कारवाई करणे, शाळेच्या एकच असलेल्या वेळा बदलण्यासाठी प्रयत्न करणे, काही ठिकाणची वाहतूक एकेरी करणे, रस्त्याच्या कडेला लागत असलेल्या वाहनांवर कारवाई करणे, काही डीपी रस्ते तयार करणे आदी सूचना करण्यात आल्या.
या सूचनांची अंमलबजावणी करून वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वाहतूक पोलिस निरीक्षक बाबासाहेब कोळी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सोसायटीतील सभासदांनी विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांसोबत स्वतः पाहणी करून समस्यावर उपाययोजना काढण्याचे सूचवले. या बैठकीसाठी एरिया सभेचे रमेश रोकडे, सारंग वाबळे, रवींद्र सिन्हा, मोरेश्वर बालवडकर, वैशाली पाटकर, विंदा शेडगे, रितू गोयल, सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.