Latest

आगामी महापालिका निवडणुकीत बंडखोर ठरणार डोकेदुखी

अमृता चौगुले

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचा अजित पवार गट सहभागी झाला आहे. त्यामुळे आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांमध्ये तिकीट वाटप करताना मोठी कसोटी लागणार आहे. त्यातून निर्माण होणारी बंडखोरी, ही या पक्षांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. फेब—ुवारी 2017 नंतर पालिका निवडणूक मुदतीमध्ये न झाल्याने 12 मार्च 2022 ला पिंपरी-चिंचवड पालिका बरखास्त होऊन दुसर्‍या दिवसापासून प्रशासकीय राजवट लागू झाली. आयुक्त हे प्रशासक म्हणून पालिकेचा गाडा हाकत आहेत. सव्वा वर्ष होऊनही निवडणुकांच्या तारखा जाहीर होत नाहीत.

त्या विविध कारणांमुळे लांबणीवर पडत असल्याने माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुक हैराण झाले आहेत. बहुतांश माजी नगरसेवकांनी जनसंपर्क कार्यालयास टाळे लावले आहे. मोजक्याच माजी नगरसेवकांकडून पूर्वीप्रमाणे प्रभागातील कामे केली जात आहेत. पालिकेत तुरळक प्रमाणात माजी नगरसेवकांचा वावर आहे. आता सर्वांनाच निवडणुकीचे वेध लागले आहेत. पिंपरी-चिंचवड पालिकेत सत्ताधारी भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. या दोन्ही पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे, तर सक्षम उमेदवारांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे या दोन पक्षांत तिकिटावरून कसोटी लागणार आहे.

एकाच प्रभागात अनेक तुल्यबळ माजी नगरसेवक व इच्छुक एकमेकांसमोर ठाकल्याने तिकीट निश्चित करताना पक्षश्रेष्ठींची तारांबळ उडणार आहे. पक्षाकडून सर्वांचे समाधान होऊ न शकल्याने बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. विरोधी पक्षाचे म्हणजे शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस व मनसे या पक्षांचा आधार बंडखोर घेऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढू शकेल.

पालिकेत शिवसेनेचे 9 नगरसेवक होते. त्यात शिंदे व ठाकरे गट, अशी विभागणी होऊन विखुरल्याने पालिकेत पक्षाची ताकद दखल घ्यावी इतकी राहिलेली नाही. तिकिटासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात खेचाखेची होणार हे, स्पष्ट आहे. प्रसंगी भाजपला नमते घ्यावे लागेल, असे राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच, सहकारी पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले) भाजपला आपल्या कोट्यातील काही तिकिटे द्यावी लागतील. त्यामुळे सध्या 128 पैकी 77 नगरसेवक असलेल्या भाजपचे 'अब की बार सौ पार' ही घोषणा पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीत उडणार?
भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोव्हेंबर महिन्यात पालिका निवडणुका होतील, असे विधान अनेक ठिकाणी केले आहे. भाजप पक्ष बैठकीतही त्या मुद्द्यावर भर दिला जात आहे. राज्याच्या शिंदे व फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सहभागी झाले आहेत. सरकारची ताकद अधिक वाढली आहे. या सर्व घडामोडी पाहता निवडणुका नोव्हेंबर महिन्यात म्हणजे दिवाळीत होतील, अशी शक्यता आहे.

सूचना मिळताच पालिकेकडून कार्यवाही केली जाईल
महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्य शासन किंवा निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेला नाहीत. तसे, आदेश मिळताच पालिकेकडून कामकाज सुरू केले जाईल, असे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT