Latest

RCB vs RR : रॉयल भिडणार रॉयल्सविरुद्ध

Arun Patil

दुबई ; वृत्तसंस्था : विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केल्याने आत्मविश्वास वाढलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ आयपीएल लढतीत उद्या (बुधवारी) राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RCB vs RR) विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल. कर्णधार कोहलीच्या आरसीबीचे 10 सामन्यांत 12 गुण असून, संघ गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर आहे. राजस्थानला पराभूत केल्यास आरसीबीचे 'प्ले ऑफ'मधील प्रवेश जवळजवळ निश्चित होण्याची शक्यता आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचे 10 सामन्यांत 8 गुण आहेत. यामुळे या संघाला आरसीबीविरुद्ध 'करो या मरो' निर्धाराने मैदानात उतरावे लागेल. उद्या पराभूत झाल्यास राजस्थानची पुढची वाटचाल अत्यंत बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
'आयपीएल – 2021'च्या दुसर्‍या सत्रात आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली. (RCB vs RR)

प्रथम कोलकाता नाईट रायडर्सने आणि त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जकडून आरसीबीला पराभव पत्करावा लागला. मात्र, तिसर्‍या सामन्यात विद्यमान विजेत्या मुंबईवर विजय मिळवून आरसीबी विजयी रुळावर परतली. मुंबईविरुद्ध कोहलीने अर्धशतक ठोकले. तर, मॅक्सवेलने 37 चेंडूंत 56 धावा चोपल्या. या हंगामानंतर कर्णधारपद सोडत असलेला कोहलीचा संघ विजयी वाटचाल कायम राखण्याचा प्रयत्न करेल.

दरम्यान, आक्रमक फलंदाज डिव्हिलीयर्सने तीन सामन्यांत 0, 12, 11 अशा एकूण 23 धावा जमविल्या आहेत. त्याची आयपीएल सॅलरी
तब्बल 11 कोटी इतकी आहे. तर, आरसीबीने वेगवान गोलंदाज जेमिसनला 15 कोटीत खरेदी केले होते. त्याला दोन सामन्यांत एकही विकेट मिळाली नाही. याशिवाय त्याची गोलंदाजी अत्यंत महागडी ठरली. मात्र, हर्षल पटेलने हॅट्ट्रिकसह सहा विकेटस् घेतल्या आहेत. तर, चहलने पाच विकेटस् घेत संघाला यश मिळवून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT