Latest

रत्नागिरी : माजी पं. स. सभापती स्वप्नाली सावंत यांचा पतीनेच खून केल्याचे उघड, पतीसह दोघांना अटक

अविनाश सुतार

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा : माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांचा पतीनेच गळा आवळून खून केल्‍याचे पाेलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत गजानन सावंत (वय ४७, रा. सडामिर्‍या चौसोपीवाडी, रत्नागिरी), रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत ( वय ४३, रा. सडामिर्‍या मधलावठार, रत्नागिरी) आणि प्रमोद उर्फ पम्या बाळु गावणंग (वय ३३, मूळ रा.विसापूर कारुळ, गुहागर, सध्या रा. मिर्‍याबंदर, रत्नागिरी) या तिघांना आज सकाळी पाेलिसांनी अटक केली. या तिघांना  न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पती-पत्‍नीमध्‍ये हाेता अनेक वर्षांपासून वाद

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वप्नाली सावंत यांना दोन मुले आहेत. त्यांचे ब्युटी पार्लर आणि कपड्याचे दुकान आहे. १ सप्टेंबर रोजी त्या दुकानात जात असल्याचे सांगून घरातून गेल्या होत्या; परंतू त्या घरी परतल्या नाहीत. पती सुकांत याने २ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. याप्रकरणी तपास करताना सुकांत आणि स्वप्नाली सावंत यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासूनचे वाद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पती देत होता वारंवार ठार मारण्याची धमकी

गेल्यावर्षी सुकांतने स्वप्नाली यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तो तिला वारंवार ठार मारण्याची धमकी देत असे. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या आदेशाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध पोलीस अधिकारी व अंमलदारांची पथके नेमून अनेक दिशेने तपास सुरू केला. तेव्हा पोलिसांना संशय आला. तपास करण्यासाठी गेले तीन दिवस पोलिसांचे पथक मिर्‍या येथे जाऊन श्वान पथकाच्या सहाय्याने तपास करत होते. परंतु पोलिसांना ठोस निष्कर्ष घेण्यासाठी पुरेसा पुरावा आवश्यक होता.

पोलीस पुरावा शोधत असताना ११ सप्टेंबररोजी स्वप्नाली सावंत यांची आई संगीता कृष्णा शिर्के (वय ६४, रा. तरवळ, जाकादेवी रत्नागिरी) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, १ सप्टेंबर रोजी त्यांची मुलगी स्वप्नाली सावंत ही त्यांच्या आईकडे तरवळला येणार होती. परंतु ती आली नाही, तेव्हा तिच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता तिच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वप्नालीची आई आणि त्यांच्या अन्य मुली मिर्‍या येथील स्वप्नालीच्या घरी गेल्या होत्या.

मृतदेह घराच्या आवारातच जाळला, रक्षा  समुद्रात टाकली

त्यावेळी तिचा पती सुकांत घरी होता. या सर्वांमध्ये मोठा वाद झाला. मी आणि माझ्या अन्य दोन साथीदारांनी मिळून १ सप्टेंबर रोजी स्वप्नालीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह घराच्या आवारातच जाळून. रक्षा समुद्रात टाकून दिल्याची कबुली सुकांत सावंत याने दिली.

पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रवीण स्वामी आदी करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT