चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 'उबाठा' शिवसेनेच्या मशालीसमोर भाजपचे कमळ की शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण, हे अद्याप ठरत नसल्याने या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. उमेदवारांच्या नावाबाबत 'चर्चा पे चर्चा' रंगत आहेत. ऐन शिमगोत्सवाच्या धामधुमीत अनेकांची नावे उमेदवारीसाठी चर्चिली जात आहेत. त्यामुळे आयत्या वेळी भाजप या मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर करणार की काय? अशीही आता कुजबूज सुरू झाली आहे.
लोकसभेची आचारसंहिता लागून काही दिवस उलटले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मशालीच्या विरोधातील उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. त्यामुळे आता भाजपच्या कमळासह धनुष्यबाण चिन्हाचे काम करणार्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. वास्तविक रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील लोकसभेची निवडणूक ही तिसर्या टप्प्यात आहे. दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे अजूनही बराच काळ या निवडणुकीसाठी आहे. पूर्ण एप्रिल महिना प्रचाराला मिळणार आहे. परंतु विरोधी पक्ष असलेल्या 'उबाठा' शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचार फेरी सुरू केली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांची घालमेल सुरू झाली आहे.
उमेदवारी जाहीर होत नसल्याने भाजपा आणि शिंदे गटाकडून नवनवीन नावे दररोज चर्चिली जात आहेत. त्यामुळे 'उबाठा' शिवसेनेच्या मशालीसमोर कमळ की धनुष्यबाण या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी कार्यकर्त्यांमध्ये उचल लागली असून किरण सामंत यांचे कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. मात्र, उमेदवारी जाहीर न झाल्याने भाजपा आणि सामंत यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत तर दुसर्या बाजूला मशालीचा प्रचार सुरू झाला आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी सर्वप्रथम पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू भैया सामंत यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे, तर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आ. प्रमोद जठार यांची नावे चर्चिली जात असताना आता अचानकपणे माजी मंत्री विनोद तावडे आणि रत्नागिरीचे माजी आ. सुरेंद्र तथा बाळ माने यांचे नावदेखील भाजपकडून आता चर्चिले जात आहे. याचवेळी दुसर्या बाजूला पालकमंत्री उदय सामंत हे लोकसभेसाठी आणि भैया सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.