कोल्हापूर, सुनील सकटे : रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठीचे आवश्यक ते सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे. ठेकेदाराची नियुक्तीही झाली आहे. यामुळे कोल्हापुरातून औद्योगिक उत्पादने, साखरेसह अन्य वस्तूंच्या निर्यातीसाठी मदत होणार आहे. तसेच वाहतूक जलद होऊन त्याचा नागरिक, उद्योजक व शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे. सुमारे पाऊण तास एवढ्या वेळेची बचत होणार आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर या महामार्गापैकी चौपदरीकरणासाठी दोन हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. 134 कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी 667.13 हेक्टर जमीन संपादित केली आहे. पूर्वी कोल्हापूर शहरातून जाणारा हा महामार्ग आता केर्लीमार्गे (बायपास) वळविण्यात आला आहे. केर्ली- शिये-चोकाकमार्गे रत्नागिरी नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे.
रत्नागिरी ते आंबा या अंतरातील भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित आंबा ते पैजारवाडी या 45 कि.मी. मार्गासाठी 170 हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. पैजारवाडी ते चोकाक या 34 कि.मी.साठी 162.67 हेक्टरचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.
या कामासाठी ठेकेदाराची निविदा मंजूर झाली असून त्याची वित्तीय परिस्थिती आणि बँक व्यवहार तपासणीचे कामही पूर्ण झाले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने वर्कऑर्डर दिल्लीला अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. मंजुरीनंतर एक-दोन दिवसांत वर्कऑर्डर दिली जाणार आहे. त्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेले भूसंपादन पूर्ण झाले असून 49 गावांतील सुमारे 12 हजार 608 खातेदारांची 24 लाख 10 हजार 260 चौ.मी. जमीन संपादित केली आहे. भूसंपादनाच्या 49 गावंपैकी सर्वाधिक म्हणजे 25 गावे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. तर पन्हाळा 10, करवीर 8 आणि हातकणंगले तालुक्यातील सहा गावांतील भूसंपादन केले आहे. या सर्व भूसंपादनासाठी महसूल विभागाने एक हजार 290 कोटी 38 लाख रुपयांचा निधी वितरित केल्याचे महसूल विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
आंबा-केर्ली-चोकाक मार्ग अंतिम : पंदरकर
या महामार्गासाठी आंबा-केर्ली-शिये-भुये-चोकाक हा मार्ग निश्चित केला आहे. हाच मार्ग अंतिम असेल. या मार्गातील गावातील भूसंपादन पूर्ण झाले आहे. लवकच वर्कऑर्डर मिळून काम सुरू होईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी सांगितले.
येथून जाणार महामार्ग
शाहूवाडी तालुक्यातील आंबा, तळवडे, केर्ले, चांदोली, चनवाड, वारुळ, वालूर, निळे, करुंगळे, येलूर, जाधववाडी, कडवे, पेरीड, भैरेवाडी, कोपार्डे, ससेगाव, करंजोशी, सावे, गोगवे, बांबवडे, वाडीचरण, चरण, डोणोली, खुटाळवाडी; पन्हाळा तालुक्यातील आवळी, देवाळे, नावली, बोरपाडळे, नेबापूर, अंबवडे, पिंपळे-सुर्वे, दानेवाडी, कुशिरे; करवीर तालुक्यातील केर्ले, पडवळवाडी, केर्ली, भुयेवाडी, भुये, जठारवाडी, शिये; तर हातकणंगले तालुक्यातील टोप, नागाव, वडगाव, हेर्ले, माले आणि चोकाक.