रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : गणपतीपुळे समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला. दोन दिवसात जवळपास पाच वेळा रेस्क्यूकडून प्रयत्न करण्यात आले होते. मंगळवारी रेस्क्यू केलेला बेबी व्हेल आज समुद्रकिनारी आला. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळनंतर रेस्क्यू करून त्याला समुद्रात खोल पाण्यात सोडण्यात आले होते. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे शव विच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
गणपतीपुळे येथे वाळूत अडकलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी पुण्यापासून संपूर्ण प्रशासन, वन विभाग, तटरक्षक दल आणि गणपतीपुळे येथील ग्रामस्थांनी तब्बल ४५ तासाहून अधिक काळ प्रयत्नांची पराकष्ठा केली. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे ३० फूट लांब व्हेलचे पिल्लू मंगळवार रात्री सुखरूप समुद्रात परतले होते.