Latest

रासप आता प्रत्येक निवडणूकीत उमेदवार उभा करणार : महादेव जानकर

backup backup

विटा; पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे आणि अजितदादा बरोबर गेलेले सगळे लोक हे सत्ता गेल्यानंतर अजून कुठे जातील हे कळणारही नाही. मात्र सामान्य जनता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसते. मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. काँग्रेस पक्षाचे नेते शहाणपणाने वागले तर त्यांना चांगले दिवस येतील, असे स्पष्ट मत भाजप महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. रासप आता प्रत्येक निवडणूकीत उमेदवार उभा करणार अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

जनस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने विट्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक शिवाजीराव हारुगडे, रासपचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील, बाळासाहेब मेटकरी, प्रणव हारुगडे, महेश मेटकरी, बबन हारुगडे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री जानकर म्हणाले, भाजप प्रणित एन डी ए आघाडी आम्हाला गृहित धरत नाही. काँग्रेस पक्ष हा गद्दार तर भाजप हा पक्ष महागद्दार आहे. हे सत्तेत येत नव्हते तेव्हा त्यांना जी दीड दोन टक्के मतांची गरज होती. त्यावेळी आमच्याशी युती करून ती दीड दोन टक्के मते मिळवून त्यांनी सत्ता हस्तगत केली. मात्र नंतर सत्तेचा घमंड त्यांच्या डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. जो तो त्याचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हालाही तेच करावे लागेल. म्हणूनच महाराष्ट्रभर फिरून जनतेत जाऊन मते आजमावत आहे. आम्हाला दोन्ही पक्ष सारखेच आहेत. काँग्रेसने त्या त्या काळात बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. आता भाजपही तेच करीत आहे. त्यामुळे दोघांपासून समान अंतरावर राहून आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सध्याचा भाजप हा गोपीनाथ मुंडेचा राहिलेला नाही. सध्याचा भाजप देवेंद्र फडणवीसांचा झाला आहे. आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपशी युती केली. मात्र सध्या कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून युती करावी, असे नेतृत्व ना काँग्रेसकडे, ना भाजपकडे आहे. त्यामुळे आम्ही कोणासोबत जायचे याचा निर्णय त्या त्या वेळी आमच्या पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड घेईल. वापरा आणि फेकून द्या या सध्या च्या धोरणामुळे भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही. आम्ही ठरविले आहे, आता कुणाच्या मागे लागायचे नाही. ज्यांना गरज असेल. ते स्वतः हून मागे येतील. पक्ष वाढवायचा असेल तर मतांची टक्केवारीपण बघितली पाहिजे. त्यासाठी रासप आपला प्रत्येक निवडणूकीत उमेदवार उभा करणार आहे असे सांगत ते म्हणाले, लोकसभा आणि संसद हे माझे प्राधान्य आहे.

मागच्यावेळी आमची युती होती. पक्षातील लोकांचा आग्रह होता. त्यामुळे विधानपरिषद आणि मंत्रीपद घेतले. आता आपल्यासाठी बारामती, परभणी, माढा मतदारसंघ तसेच उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर असे मतदारसंघाचे पर्याय खुले आहेत असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नितीन गडक री यांच्यावर कॅगने ओढलेल्या ताशेऱ्याबाबत जानकर म्हणाले, गडकरी यांनी देशभरात केलेली रस्त्याची कामे उल्लेखनीय आहेत. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर चांगली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला अशा गोष्टींमुळे तडा जाऊ शकत नाही. मात्र त्याच वेळी कानफटीला पिस्तूल लावून भाजपात प्रवेश करून घेतात या मताशी असहमती दाखवत जानकर यांनी मी युती केली त्यावेळी मला आणि भाजप दोघांनाही गरज होती. त्या गरजेपोटी युती केली होती. त्यामुळे मला भाजपचा तसा अनुभव नाही असेही ते म्हणाले. सध्याच्या सरकारमध्ये निधीची कितीही मोठी घोषणा केली जात असली तरी प्रत्यक्षात किती निधी मिळतो याबाबतची खात्री नाही असेही एका प्रश्नाच्या उत्तरात जानकर सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT