Latest

Ranji Trophy 2022 : दीपक धपोलाचा मोठा कारनामा, ८ षटकांत घेतल्या ८ विकेटस्

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : रणजी ट्रॉफीमधील (Ranji Trophy 2022) उत्तराखंड विरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्याच्या पहिल्याच दिवशी उत्तराखंडचा वेगवान गोलंदाज दीपक धपोलाने एक मोठा कारनामा करून दाखवला. 32 वर्षांच्या दीपकने हिमाचल प्रदेशचा जवळपास सर्वच संघ एकट्याने बाद केला. दीपकने 8.3 षटकांत 35 धावा देत 8 फलंदाज बाद केले. या कामगिरीचे कौतुक खुद्द बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केले आहे.

उत्तराखंडच्या 32 वर्षांच्या दीपक धपोलाने आपल्या भेदक मार्‍याने हिमाचल प्रदेशचा पहिला डाव सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच गुंडाळला. हिमाचलचा संपूर्ण संघ 49 धावांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. हिमाचल प्रदेशचे 5 फलंदाज भोपळाही न फोडता माघारी गेले.

हिमाचल प्रदेशकडून अंकित कालसीने सर्वाधिक 26 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त इतर फलंदाजाना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही. उत्तराखंडकडून दीपक धपोलाने 8 तर अभय नेगीने 2 विकेटस् घेतल्या. हिमाचलचा पहिला डाव 16.3 षटकांत 49 धावांत संपुष्टात आला.

उत्तराखंडने आपल्या पहिल्या डावात दिवसअखेरपर्यंत 6 बाद 295 धावांपर्यंत मजल मारली होती. उत्तराखंडकडून आदित्य तारेने नाबाद 91 धावा केल्या आहेत. तर अभय नेगी 48 धावा करून नाबाद आहे. उत्तराखंडकडून कर्णधार जीवज्योज सिंहने देखील 45 धावांचे योगदान दिले. हिमाचल प्रदेशकडून कर्णधार ऋषी धवनने 3 विकेटस् घेतल्या आहेत.

जय शहा यांनी केले कौतुक (Ranji Trophy 2022)

दीपकच्या या कामगिरीनंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट केले. जय शहा आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'रणजी ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा देशातील गुणवत्ता पुढे आली आहे. यावेळी दीपक धपोलाने हिमाचल प्रदेश विरुद्ध 8 षटकांत 35 धावा देत 8 विकेटस् घेतल्या. रणजी ट्रॉफीतील ही एक उत्तम कामगिरी आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT