Latest

प्रतीक्षा संपली; रामलल्लाची उद्या प्राणप्रतिष्ठापना

Arun Patil

अयोध्या, वृत्तसंस्था : अयोध्या आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरासह जगभरातील सर्व श्रीराम भक्तांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वेध लागले आहेत. पाचशे वर्षांपासूनची प्रतीक्षा संपायला केवळ एक दिवस उरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी दुपारी 12.20 ते 1 या वेळेत प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम होईल.

यावेळी श्री रामलल्लाच्या डोळ्यांवरील पट्टी काढली जाईल. पंतप्रधान सुवर्णदंडिकेने श्री रामलल्लाला काजळ लावतील आणि आरसा दाखवतील.
शुक्रवारी रात्री उशिरा श्रीराम मंदिरावर फुलांनी सजावटीचे काम सुरू झाले. रोषणाईही करण्यात आली. 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा विधी सुरू आहे. शनिवारी विधीचा पाचवा दिवस होता. शनिवारी वास्तुशांती करण्यात आली.
श्री रामलल्ला सिंहासनावर विराजमान झाले आहेत. सकाळी श्री रामलल्लाचा शर्कराधिवास, फलाधिवास विधी संपन्न झाला.
पाकिस्तानातील हिंगलाज शक्तिपीठाचे पाणी अयोध्येत पोहोचले. श्री रामलल्लाच्या अभिषेकासाठी जगातील अनेक देशांतून जल आलेले आहे. भारतीय उपखंडातील 7 नद्यांचे जलही आलेले आहे. सिंधू आणि कावेरीचे जल शनिवारी दाखल झाले.

एक देश, एक भाव

अयोध्येतील रामोत्सवादरम्यान वाणी शुक्ला यांनी तुळशी उद्यानात व्हीलचेअरवर बसून नृत्य सादर केले. राजस्थानच्या जस्सू खान यांनी श्रीराम भजन गायिले. हिमाचल प्रदेशातील लोककलाकारांनी सिरमौरी नाटी नृत्य सादर केले. गुजरातच्या जेसी जडेजानेही पारंपरिक नृत्य सादर केले. राजस्थानी गायक रजनीकांत शर्मा यांनी श्रीराम भजन गायिले. पश्चिम बंगालमधील कलाकारांनी छाऊ नृत्य सादर केले.

अयोध्येच्या सीमा सील

शनिवारी रात्री 8 वाजता अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या. 23 तारखेपर्यंत कुणीही अयोध्येत प्रवेश करू शकणार नाही. प्राणप्रतिष्ठेला आमंत्रित पाहुणेच अयोध्येत दाखल होऊ शकतील. पास पाहूनच प्रवेश दिला जाईल.

पांडेय यांना निमंत्रण

अयोध्येवर मुगल सैन्याने हल्ला केला तेव्हा वीर योद्धा देवीदीन पांडेय यांनी एकट्याने 700 सैनिकांना ठार मारले होते. त्यांच्या सातव्या पिढीतील वंशज पंडित दुर्गाप्रसाद पांडेय यांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने शनिवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. बाबराने लिहिलेल्या 'बाबरनामा' या आत्मचरित्रातही वीर योद्धा देवीदीन पांडेय यांच्या शौर्याचा उल्लेख आलेला आहे.

पंतप्रधानांना अयोध्येसाठी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात होते. या मंदिराकडून अयोध्येसाठी काही भेटी पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT