खेड; पुढारी वृत्तसेवा : आमच्या कदम खानदाना समोर जो कोणी आडवा येईल त्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम माजी मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी खेड येथे रविवारी आयोजित सभेत विरोधकांना दिला.
यावेळी बोलताना त्यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना सांगितले की, असे शंभर भास्कर जाधव सारख्यांना खिशात घेऊन फिरतो. माजी पालकमंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांचा त्यांनी 'एपी' असा उल्लेख केला. सुभाष देसाई यांचा बदमाश असा उल्लेख करताना खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे हे खोटे बोलतात, असेही ते म्हणाले. जसा अफजलखान महाराष्ट्रावर लाखो सैनिक घेऊन चाल करुन आला होता तसे उद्धव ठाकरे खेडला आले होते. शेवटी ते म्हणाले की, मी कधीही स्वाभिमान सोडणार नाही. शेवटपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. खेड दापोली तालुक्यातील कुणबी भवन व अल्पसंख्याक समाजासाठी निधीची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. ती मुख्यमंत्री यांनी मान्य केली.
रत्नागिरी जिल्ह्यात 2024 ला पाचही आमदर हे शिवसेनेचे निवडून येतील, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. उद्धव ठाकरे यांनी आ. योगेश कदम यांचे खच्चीकरण करुन दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेस कशी वाढेल याची व्यवस्था केली, असा आरोप त्यांनी यावेळी केला. सभेच्या सुरूवातीला आ. योगेश कदम यांनी दमदार भाषण करत उपस्थितांचे लक्ष वेधले.