Latest

Ram Mandir Inauguration : सासरवाडीतून भेटवस्तूंचा खजिना

Shambhuraj Pachindre

अयोध्या; वृत्तसंस्था : अयोध्येत मंदिर होणार हे ठरल्यापासूनच जनकपुरासह एकूणच नेपाळमधील भाविकांतही उत्साहाचे वातावरण आहे. नेपाळमधील अनेक भाविक जनकपुरातून संदेशयात्रा शीर्षकांतर्गत काढण्यात आलेल्या मिरवणुकीसह अयोध्येत आलेले आहेत. रामलल्लासाठी चरण पादुका, धनुष्यबाण, सोने-चांदी, मेवामिठाई अशा उदंड भेटवस्तू या भाविकांनी आणल्या आहेत. (Ram Mandir Inauguration)

संदेश यात्रेसह आलेले जनकपुरातील जानकी मंदिराचे महंत राम रोशन दास यांनी सांगितले की, प्रभू राम हे आमचे जावई आहेत. अनेक दिवस ते त्यांच्याच अयोध्येत बेघर म्हणून राहिले. तंबूत दिवस काढले. रामजींना त्यांच्या हक्काचे घर मिळाल्याचा आनंद म्हणून आम्ही ही संदेशयात्रा घेऊन इथपर्यंत आलो आहोत. (Ram Mandir Inauguration)

नेपाळहून आले सोळा नद्यांचे जल

कारसेवकपूरममध्ये नेपाळहून बागमती, नारायणी, गंगा सागर, दूधमती, काली, गंडकी, कोशी, कमलासह 16 नद्यांचे जलही दाखल झालेले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेपाळ शाखेचे अध्यक्ष जितेंद्र म्हणाले, सर्व जलकुंभ आधी जनकपुरात आणले. तेथून 27 डिसेंबरला मिरवणुकीसह अयोध्येसाठी निघालो.

जगातील सर्वात मोठा दिवा; आकडे बोलतात

  • 22 : जानेवारीला अयोध्येतील रामघाटावर तुळशीवाडीत त्रेतायुग काळातील दिव्यासारखा दिवा प्रज्वलित केला जाईल.
  • 28 : मीटर व्यासाचा हा दिवा जगातील सर्वात मोठा दिवा असेल.
  • 21 : क्विंटल तेल तो प्रज्वलित करण्यासाठी लागणार आहे.
  • 108 : लोक मिळून हा दशरथ दीप तयार करत आहेत.
  • 7.5 : कोटी रुपये या दिव्यावर खर्च होणार आहे.
  • 1.25 : क्विंटल कापसापासून तयार करण्यात आलेली वात या दिव्यात तेवणार आहे.

शरयूत कमांडो पेट्रोलिंग

अयोध्येतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस नेटवर्कचा भाग दिल्लीतील प्रजासत्ताक दिन समारंभाच्या तोडीची सुरक्षा प्राणप्रतिष्ठेसाठी राबविली जात आहे. अयोध्येतील सर्व खासगी सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस नेटवर्कशी जोडण्यात आले आहेत. रिक्षा, ई-रिक्षा, टॅक्सीचालकांनाही सुरक्षा यंत्रणेत सामावून घेण्यात आले आहेत. हॉटेल्स, धर्मशाळा, मंदिरांत कुणीही ओळखपत्राशिवाय थांबू शकणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. अँटी ड्रोन सिस्टीमही बसविली जात आहे. शरयू नदीत पेट्रोलिंग सुरू आहे. अयोध्येतील सुरक्षा तीन पातळ्यांची आहे. मंदिर क्षेत्र रेड झोनमध्ये असून, अवघी अयोध्या यलो झोन, तर बाह्य परिसर ब्ल्यू झोन ठरविण्यात आला आहे. (Ram Mandir Inauguration)

ध्वजदंड अहमदाबादेतून रवाना

मंदिरात प्रतिष्ठित होणार असलेले ध्वजदंड अहमदाबादेतून शनिवारी अयोध्येकडे रवाना झाले. विधिपूर्वक हा समारंभ झाला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यावेळी उपस्थित होते. सर्व 7 ध्वजदंड अयोध्येला रवाना झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT