Latest

Ram Mandir : बालकाण्ड भाग 3 : मारीच आणि सुबाहुचे पारिपत्य

मोहन कारंडे

संकलन : सुरेश पवार

श्रीरामाला सर्व अस्त्रविद्या प्रदान केल्यानंतर ब्रह्मर्षी विश्वामित्र सिद्धाश्रम या आपल्या आश्रमात आले. आश्रमवासी मुनिजनांनी त्यांचे स्वागत केले. विश्वामित्रांचे पूजन केले. राजपुत्रांचे आदरातिथ्य केले. काही काळ विश्रांतीनंतर श्रीरामाने विश्वामित्रांना प्रार्थना केली, 'हे मुनिश्रेष्ठ, आजच आपण यज्ञदीक्षा घ्यावी. आपला यज्ञ शेवटास जावो. त्या दुराचारी राक्षसांचा येथेच वध करण्याचे आपले वचन साध्य होवो.' श्रीरामाच्या प्रार्थनेनंतर त्या महाज्ञानी ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी यज्ञदीक्षा घेतली. रात्री निद्रेनंतर राजपुत्रांनी प्रात: संध्येनंतर मुनिश्रेष्ठींचे दर्शन घेतले. विश्वामित्र होमहवनात मग्न होते. त्यानंतर राक्षसांच्या पारिपत्यासाठी त्यांनी महर्षी विश्वामित्रांची अनुज्ञा मागितली. त्यावर महर्षींनी यज्ञदीक्षा घेतली आहे, त्यांचे मौन आहे, असे सांगून मुनिजनांनी उभयता बंधूंना आजपासून सहा दिवस आश्रमाचे संरक्षण करावे, अशी सूचना केली.

मुनिजनांच्या सूचनेनुसार श्रीराम-लक्ष्मण अहोरात्र आश्रमाच्या रक्षण कार्यात मग्न झाले. पाचही दिवस निद्रा न घेता त्यांनी आश्रमाचे डोळ्यात तेल घालून रक्षण केले. सहावा दिवस उजाडला तेव्हा श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले, आज अधिक सावधगिरीने राक्षसांच्या निर्दालनासाठी सज्ज राहू या! त्याप्रमाणे उभयता बंधू सहाव्या दिवशी अत्यंत दक्षतेने रक्षणासाठी सज्ज झाले.

राम-लक्ष्मण असे युद्धोत्सुक असताना, महर्षी विश्वामित्र व इतर ऋत्विज यांनी यज्ञाचा प्रारंभ केला. दर्भ, पुष्पासह समिधांनी समृद्ध यज्ञवेदीतून अग्नी प्रकट झाला. यज्ञाचे अनुष्ठान समंत्रक व यथाविधी सुरू झाले. तोच आकाशात भयंकर आवाज होऊ लागला. भर पावसाळ्यात जशी मेघगर्जना होते, तशी महागर्जना करीत ते मायावी राक्षस यज्ञस्थळी धावून आले.

मारीच, सुबाहू आणि त्यांचे राक्षस अनुयायी यांनी यज्ञस्थळी रक्ताचा वर्षाव करायला सुरुवात केली. श्रीरामाच्या द़ृष्टीस रक्तसिंचित यज्ञवेदी पडताच, तो यज्ञशाळेबाहेर राक्षसांच्या पारिपत्यासाठी आला. त्यावेळी आकाशातून आपल्या रोखाने धावून येणारे ते महाकाय राक्षस त्याच्या नजरेस पडले. तेव्हा तो एकबाणी महापराक्रमी श्रीराम आपला बंधू लक्ष्मण याला म्हणाला, "वादळी वार्‍याने मेघ जसे नाहीसे होतात, त्याप्रमाणे या दुराचारी राक्षसांना मी मानवास्त्राने उडवून लावतो. अशा दुर्बलांचा वध करण्याचे माझ्या मनाला येत नाही." याप्रमाणे बोलून श्रीरामाने आपल्या अद्वितीय धनुष्याला बाण लावला. प्रत्यंचा ओढली. अत्यंत क्रोधाविष्ट झालेल्या श्रीरामाने बाणावर मानवास्त्राचे अभिमंत्रण केले आणि मारीच राक्षसाच्या छातीचा वेध घेतला. मारीचवर बाण आदळताच मारीच राक्षस शंभर योजने दूर सागरात जाऊन पडला. सागरात तडफड करीत पडलेल्या मारीचाचे अवलोकन करून राम म्हणाला, "हे लक्ष्मणा! मी आता इतर पापी, दुरात्म्या राक्षसांचा समाचार घेतो." यानंतर त्या महारथी रामाने महाशक्तिशाली आग्नेयास्त्राची योजना करून ते सुबाहू राक्षसावर सोडले. त्या अस्त्राचा जबर तडाखा बसून सुबाहू राक्षस जमिनीवर कोसळला. सुबाहुचे पारिपत्य केल्यावर श्रीरामाने वायव्यास्त्राची योजना करून उर्वरित राक्षसांना यमसदनी पाठवले.

सर्व यज्ञघातकी राक्षसांचे निर्दालन झाल्यावर आश्रमवासी मुनीजनांना आनंद झाला. महापराक्रमी रामाचे आश्रमवासी मुनीजनांनी इंद्राप्रमाणे पूजन केले. यानंतर विश्वामित्र ऋषींचा यज्ञ यथासांग पार पडला. यज्ञाची सांगता झाली. महामुनी विश्वामित्रांनी सर्व प्रदेश पीडारहित झाल्याचे पाहिले आणि मग रघुकुलतिलक श्रीरामाला ते म्हणाले, "हे महाबली माझा मनोरथ सिद्धीस गेला. गुरूंचे म्हणणे तू शेवटास नेलेस. हे महायशस्वी वीरा, या आश्रमाचे सिद्धाश्रम नाव तू सार्थ केलेस!" विश्वामित्रांनी श्रीरामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. शुभाशीर्वाद दिले.

अशारीतीने राजर्षी विश्वामित्रांचा महायज्ञ यशस्वी झाला. यज्ञात विघ्न आणणार्‍या राक्षसांचा नायनाट झाला. श्रीरामाने अल्पवयात बलाढ्य राक्षसांचे पारिपत्य केल्याने त्याच्या पराक्रमाची वाहवा झाली.

॥ जय श्रीराम ॥

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT