मुंबई ; सुरेश पवार : राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकांमुळे राज्याचे सारे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत आणि सहाव्या जागेसाठी काटाजोड कुस्ती होत आहे. प्रारंभी सत्तारूढ आघाडीला सहज वाटणार्या निवडणुकीची वाटचाल सत्तारूढांना दिवसेंदिवस खडतर होत चालली असून, 'राजा, रात्र वैर्याची आहे, जागा रहा', असे इशारे राजकीय वर्तुळात उमटत आहेत.
सत्तारूढ महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे संख्याबळ आणि पक्ष आघाडीशी संधान असलेले छोटे पक्ष आणि अपक्ष यांची गोळाबेरीज आघाडीला प्रारंभी तरी भक्कम अशी होती. तथापि, आता काही छोट्या पक्षांनी आपले मनसुबे आणि पत्ते खोलायला सुरुवात केल्याने आघाडीची वाटचाल बिकट झाल्याचे दिसत आहे.
छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्यात चलबिचल होत असतानाच आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी 42 मतांच्या कोट्यापेक्षा अधिक मतांची जोडणी केली, तर त्याचाही थेट परिणाम सहाव्या जागेच्या लढतीवर होऊ शकतो. काँग्रेसची 44 मते आहेत आणि धोका पत्करायचा नाही, म्हणून ही सर्व मते काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी यांच्या पारड्यात जाऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्ती प्रफुल्ल पटेल यांच्यासाठीही कोट्यापेक्षा अधिक मतांची तजवीज केली जाऊ शकते. असे झाले तर सहाव्या जागेच्या लढतीतील शिवसेना उमेदवाराच्या हक्काची काही मते कमी होण्याचा धोका होऊ शकतो.
शिवसेना अथवा भाजपला मतदान न करण्याची भूमिका एमआयएमने घेतली आहे. समाजवादी पार्टीची भूमिका संदिग्ध आहे, तर हितेंद्र ठाकूर यांचेही तळ्यात-मळ्यात चालले आहे. एमआयएम कदाचित मुस्लिम म्हणून प्रतापगढी यांना मते देण्याची शक्यता बोलली जाते, तर सपाही तोच कित्ता गिरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी असा निर्णय घेतला, तर काँग्रेसची मते वाढतील. पण त्याचा लाभ शिवसेनेच्या दुसर्या उमेदवारासाठी होणार नाही.
शिवसेनेने पक्षांतर्गत मतांचा कडेकोट बंदोबस्त केला असला, तरी घटक पक्षांच्या उमेदवारांना कोट्यापेक्षा अधिक मते पडण्याची भीती आणि छोट्या पक्षांची भूमिका शिवसेनेला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिवसेनेसाठी 'राजा, रात्र वैर्याची आहे, जागा रहा', असा इशारा मिळत आहे.
दूरगामी परिणाम!
शुक्रवार, दि. 10 जूनला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे तर सोमवार, दि. 13 जूनला निकाल जाहीर होणार आहे. या पाठोपाठच विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होत आहे. राज्यसभा निवडणूक निकालाचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच अनुकूल निकाल लागला तर भाजप आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.