जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : जागतिक बाजारपेठेत साखरेचा दर वाढून सुमारे साडेसहा हजार रुपयांवर पोहोचला आहे. देशात सध्या साखरेला किमान 3,850 रुपये भाव मिळत आहे. यामुळे गत हंगामातील उसाला दसर्यापूर्वी किमान 400 रुपये जादा मिळालेच पाहिजेत; अन्यथा 7 नोव्हेंबरला आम्ही जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत पुढच्या आंदोलनाची घोषणा करू. मागचा हिशेब पूर्ण केला तरच यंदा ऊसपुरवठा करू; अन्यथा एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना स्वाभिमानीच्या मागणीचे निवेदन देऊन मंगळवारी आक्रोश यात्रेला सुरुवात झाली. शिरोळ शहरातील प्रमुख मार्गांवर आक्रोश यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
शिवाजी चौकात यात्रा आल्यावर उपस्थित शेतकर्यांसमोर बोलताना शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर उद्योगाचा अभ्यास करूनच अधिकच्या 400 रुपयांची मागणी केली आहे आणि ते पैसे शेतकर्यांना मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. यावर्षी साखरेचे भाव वाढले आहेत, त्यामुळे कारखानदारांकडे किमान 500 ते 600 रुपये शिल्लक राहत आहेत. म्हणूनच गतवर्षी गाळप झालेल्या उसाला अधिकचे 400 रुपये मिळालेच पाहिजेत, याकरिता प्रत्येक साखर कारखानदारांच्या दारात जाऊन ढोल वाजून त्यांना निवेदन देणार आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, जनार्दन पाटील, माजी उपसभापती सचिन शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, मिलिंद साखरपे, आप्पासो पाटील, नगरसेवक प्रकाश गावडे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बच्चू कडू यांच्याकडून शेट्टींना आसूड भेट
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सांगली येथे भेट घेतली. त्याचबरोबर आक्रोश मोर्चाच्या 522 किलोमीटर पदयात्रेस पाठिंबा व्यक्त करून शेतकर्यांच्या प्रश्नांवर आवाज तीव्र करण्यासाठी आसूड देऊन सत्कार केला. यावेळी स्वाभिमानीचे नेते सावकर मादनाईक, शिरोळ तालुकाध्यक्ष शैलेश आडके, सागर मादनाईक यांच्यासह प्रहार व स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.