राजू शेट्टी 
Latest

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा कार्यक्रम उधळून लावू : राजू शेट्टी

Arun Patil

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : मागील थकीत असलेले उसाचे पैसे व यंदाच्या पहिल्या उचलीचा प्रश्न अद्यापही मिटलेला नाही. आमचे हक्काचे पैसे जिल्ह्यातील साखर कारखानदार लुटू पाहत आहेत. हे कारखानदार शेतकर्‍यांची खळी लुटत असतील तर मी स्वस्थ बसणार नाही. शुक्रवारी (दि.17) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना कोल्हापुरात येऊ देणार नसून त्यांचा कार्यक्रम उधळणार आहे. तसेच स्वाभिमानीचे कार्यकर्ते विमानतळाला घेराव घालणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.

दरम्यान, भाऊबिजेला शेतकर्‍यांच्या माताभगिनी साखरसम्राटांना खर्डा-भाकरी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर कार्यकर्त्यांसह पाचव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरू होते. यावेळी शेट्टी म्हणाले की, जिल्ह्यात ऊस तोडी बंद आहेत. आम्ही शेतकर्‍यांचे हक्काचे पैसे मागतो आहोत. कुणीही इथे व्यासपीठावर यावे, मी कधीही हिशेब सांगतो. पैसे कसे देता येईल ते. साखर कारखानदार शेतकर्‍यांचे पैसे बुडवत आहेत. आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहोत. तरीही पोलिस आमच्यावरच गुन्हे दाखल करत आहेत.

टाकळीवाडी येथील शेतकर्‍यांनीही स्वतःहून ऊस तोडी बंद केल्या आहेत. दिवाळीपर्यंत आम्ही संयमाने आंदोलन करत आहोत. त्यानंतर मात्र सरकार व कारखानदारांना सळो की पळो करून सोडू. यावेळी सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, राम शिंदे, शैलेश आडके, सागर संभूशेटे, शैलेश चौगुले आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT