पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनंतर आता एका अभिनेत्याच्या पॅन कार्डचा गैरवापर करत त्याच्या नांवावर कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिनेता राजकुमार राव याच्या पॅन कार्डचा (PAN card) चुकीच्या पद्धतीने वापर करत कर्ज उचलले आहे. पॅन कार्डशी छेडछाड करत माझ्या नांवावर कर्ज घेतल्याचे राजकुमार राव याने म्हटले आहे.
या फसवणुकीमुळे माझ्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम झाला आहे. या प्रकरणात क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड च्या अधिकाऱ्यांना लक्ष घालण्यास सांगितले आहे, असे राजकुमार यांनी सांगितले. याबाबत अभिनेता राजकुमार राव याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "#FraudAlert माझ्या पॅन कार्डचा दुरूपयोग करण्यात आला आहे. माझ्या नांवावर छोटे कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे माझ्या सिबिल स्कोरवर परिणाम झाला आहे. कृपया हे दुरुस्त करून त्याविरूद्ध सावधगिरीचे उपाय करा, अशी विनंती क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) कडे करण्यात आली आहे. परंतु, सिबिलच्या अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
दरम्यान, याआधी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या पॅन कार्डचा गैरवापर करत तिच्या नांवावर २ हजार रूपये कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे तिच्या क्रेडिट स्कोरवर परिणाम झाला होता. याबाबत आरोप करताना पॅन कार्डचा गैरवापर करत धनी अॅपवरून कर्ज घेतल्याचे सनीने म्हटले होते.
फसवणुकीचे असले प्रकार लक्षात घेता आपणही सावधानता बाळगणे गरजे आहे. पॅन कार्डसोबत इतर महत्त्वाची कागदपत्रे शेअर करू नका. त्याचबरोबर कोणत्याही मेसेजची खातरजमा केल्याशिवाय त्या मेसेजला उत्तर देऊ नका. अशा मेसेजपासून सतर्क रहा. तर आपल्या कागदपत्रांचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असल्याचे लक्षात आल्यास त्वरित संबंधित विभागाकडे तक्रार करा.
हेही वाचलंत का ?