राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : राजगुरुनगर शहराच्या वाहतूक कोंडीला संपुष्टात आणणारा पुणे नाशिक महामार्गाचा बाह्यवळण रस्ता मार्च अखेर पूर्णत्वास येत आहे. या कामाच्या चांडोली टोल नाक्यापासून सुरू होणाऱ्या ग्रेड सेपरेटर भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याची पाहणी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी केली. यावेळी ही माहिती दिली. कंपनीचे प्रकल्प मॅनेजर प्रवीण भालेराव, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर यावेळी उपस्थित होते. बाह्यवळण मार्गाची ५ किलोमीटर लांबी आहे.
लहान-मोठे १० पुल व बांधकामे, सेवा रस्ता व संपूर्ण रस्त्यावरील डांबरीकरण, विद्युतीकरण आणि वृक्षारोपण पूर्ण करण्यात येत आहे. ६०० मीटर लांब असलेल्या या अंडरग्राउंड ग्रेड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर होऊन वेळेत पूर्ण झाले. रस्त्याच्या मध्यभागी साडेपाच मीटर उंची (जवळपास १८ फूट), सहा लेन असलेल्या पुलाची निर्मिती पूर्ण झाली असून, २०० बाय १०० फूट जुन्या हायवेवर हा पूल बांधला गेला आहे. या जंक्शनवर भविष्यात सुशोभीकरण करण्यात यावे, अशी सूचना प्रकल्प अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
राजगुरुनगरकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाला स्वतंत्र रस्ता तयार करण्यात आला आहे. तसेच पुण्याहून येणारी वाहने राजगुरुनगरकडे जाताना सेवा रस्त्याचा वापर करणार आहेत. भीमा नदीवर २०० मीटर लांबीचा पुल उभारण्यात आला आहे. पाबळ रोड क्रॉसिंगवर ४५० मीटर लांबीचा मोठा पूल बांधण्यात आला आहे .याची सुद्धा उंची साडेपाच मीटर ठेवण्यात आली आहे. भविष्यात होणाऱ्या वाहनांच्या वाढीव संख्येनुसार सर्व पुलांची बांधकामे सहापदरी करण्यात आली आहेत. भीमा नदीवर ये-जा करण्यासाठी मोठे दोन पूल वेळेत पूर्ण झाल्यामुळे या कामाला गती मिळाली आहे. वाफगावकडे जाणाऱ्या ६० मीटर लांबीच्या पुलाची उंची साडेचार मीटर ठेवण्यात आली आहे.
चास कमान कालव्यावर पूल, तुकाई मंदिराशेजारी ओढ्यावरील पूल, टाकळकरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल असे सहा मोठया बांधकामांचा समावेश आहे. खेड-सिन्नर या चार पदरी रस्त्याची निविदा आयएसएफएल कंपनीने घेतली होती. परंतु ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर राजगुरुनगर, खेडघाट, मंचर, कळंब, नारायणगाव आणि आळेफाटा बाह्यवळण ही महत्त्वाची कामे रेंगाळली होती.
या अर्धवट बंद पडलेल्या कामाची विशेष बाब म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतंत्र निविदा प्रक्रिया पार पाडून या कामांना गती दिली. यामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व सध्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असे मेदगे यांनी सांगितले.