कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांचे व्यवसाय दोन नंबरचे आहेत. त्यातून वाचण्यासाठी त्यांची अवस्था पळता भुई थोडी अशी झाली आहे. परिणामी, ते लवकरच भाजपमध्ये जातील, असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
क्षीरसागर म्हणाले, पाटील हे शिवसेनेचे बोट धरून विधानसभेत गेले. त्यानंतर काँग्रेसला त्यांनी जवळ केले. शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार भाजपकडून लढणार, हे त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे. आम्ही एकसंध आणि भक्कम आहोत. आमचे सर्व 18 खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
मुरलीधर जाधव यांना आता कळाले
पहिल्यापासून आमची भूमिका हीच आहे की, आमच्यावर अन्याय होतोय. आम्हाला आमचे मतसुद्धा व्यक्त करता येत नाही. मुरलीधर जाधव यांना आता कळाले आहे. बाकीच्यांनाही लवकरच कळेल. लोकांचे मत आम्हाला विधानसभेत मांडता येत नव्हते, इतका दबाव आमच्यावर होता. जाधव शिंदे गटात येणार असतील तर त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट
केले.
'उत्तर', 'दक्षिण'मधून शिवसेनेचे आमदार विधानसभेत
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांतून शिंदे गटाचे आमदार होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून वरिष्ठ आदेश देतील तो पाळणार. लोकसभेला जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही ठाम राहू.