पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे शुक्रवारी भारतीय लष्कराचा सराव सुरू होता. यादरम्यान जमिनीवरून हवेत मारा करणारी तीन क्षेपणास्त्रे मिसफायरमुळे हवेत स्फोट झाला. यातील दोन क्षेपणास्त्रांचे अवशेष लष्कराला मिळाले असून तिसऱ्या क्षेपणास्त्राचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, असे लष्कराचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये लष्कराचा सराव सुरू होता. त्याचवेळी जमिनीवरून हवेत मारा करणारी तीन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या तिन्ही क्षेपणास्त्रांचा मिसफायरमुळे आकाशात स्फोट झाला. ही क्षेपणास्त्रे फील्ड फायरिंग रेंजच्या बाहेर जाऊन पडली. यातील एका क्षेपणास्त्राचे अवशेष फील्ड फायरिंग रेंजच्या बाहेर अजासर गावाजवळील शेतात सापडले. तर दुसऱ्या क्षेपणास्त्राचे अवशेष सत्याय गावापासून दूर एका निर्जन भागात सापडले. क्षेपणास्त्रांच्या मिस फायरमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तिसऱ्या क्षेपणास्त्राचा शोध अजूनही सुरू आहे.
लष्कराचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले की, पीएफएफआरमधील एका युनिटच्या सरावादरम्यान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या तीन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. क्षेपणास्त्र उड्डाण करत असताना क्षेपणास्त्रात स्फोट झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आतापर्यंत दोन क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडले असून तिसऱ्या क्षेपणास्त्राचा शोध सुरू आहे.