Latest

‘राजाराम’चा निकाल महाडिक गटासह भाजपला उभारी देणारा

दिनेश चोरगे

कोल्हापूर; विकास कांबळे : छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जिल्ह्यात महाडिक गटासह भाजपला उभारी देणारा आहे. आ. सतेज पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यामध्ये लढत दिसली असली, तरी यावेळी महाडिक यांना राज्यात भाजप सोबत असणार्‍या जिल्ह्यातील नेत्यांनी केलेली मदत व शिवसेना शिंदे गटाने दिलेली साथ यामुळे या निवडणुकीत महाडिक यांचे मताधिक्य वाढल्याचे दिसते. या निवडणुकीच्या निकालाने आ. सतेज पाटील यांचा विजयाचा वारू रोखण्यात महाडिक गटाला खूप वर्षांनी यश आले आहे. स्थानिक पातळीवरील महाडिक गटाच्या पराभवाची मालिका यानिमित्ताने खंडित झाली. या निकालामुळे आगामी महापलिका, जिल्हा परिषद, विधानसभेच्या निवडणुकांत महाडिक गट ताकदीने उतरणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महाडिक व पाटील यांच्यातील संघर्ष जवळपास गेल्या दीड दशकापासून सुरू आहे. आ. पाटील यांनी महाडिक यांच्या विरोधात जिल्ह्यातील नेत्यांची मोट बांधत महाडिक यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. महाडिक यांच्या ताब्यात असणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये प्रत्येकवेळी त्यांना यश येत गेले. महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ येथील महाडिक यांची सत्ता संपुष्टात आणली. केवळ राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये महाडिक यांची सत्ता राहिली होती. ती सत्तादेखील संपुष्टात आणण्यासाठी आ. पाटील यांनी 'आमचं ठरलंय', 'कंडका पाडायचा' ही टॅगलाईन घेऊन कंबर कसली होती. आ. पाटील यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक होती. परंतु, सभासदांनी सत्तारूढ आघाडीला साथ दिल्यामुळे आ. पाटील यांचाच कंडका पडल्याचे चित्र निकालातून दिसून आले.

गेल्या निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल मान्य करत त्यांनी दुसर्‍या दिवसापासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. राजाराम कारखान्याचे 1899 सभासद कार्यक्षेत्राबाहेरचे असल्याचा आरोप करून त्यांचे सभासदत्व रद्द करावे म्हणून न्यायालयीन लढाई सुरू केली. जवळपास गेल्या तीन वर्षांपासून ही लढाई सुरू होती. परंतु, यामध्ये त्यांना यश आले नाही. न्यायालयाने 1899 शेतकर्‍यांचे सभासदत्व कायम ठेवण्याचा आदेश दिला. आ. पाटील यांना हा पहिला धक्का मानला जातो. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यात आले. छाननीमध्ये 29 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. यामध्ये महाडिक गटातून पाटील गटात गेलेले कारखान्याचे माजी अध्यक्ष तसेच काही माजी संचालकांचा समावेश होता. पाटील गटाचे हे तगडे उमेदवार होते. त्यांचेच अर्ज अपात्र ठरविण्यात आले. हा पाटील गटाला जबर धक्का होता. पाटील हे निवडणुकीच्या नियोजनात तरबेज मानले जातात; परंतु त्यांच्या ध्यानीमनीही नसताना महाडिक गटाने केलेली ही खेळी म्हणजे बिन आवाजाचा बॉम्ब होता. हीच खेळी महाडिक गटाला उपयोगी पडली.

गेल्या निवडणुकीत महाडिक एकटे लढले होते, तरीही त्यांची कारखान्यातील सत्ता कायम राहिली; मात्र मताधिक्य फार कमी होते. जिल्ह्याच्या राजकारणात आ. पाटील, आ. विनय कोरे व आ. हसन मुश्रीफ यांचा दोस्ताना संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे आ. कोरे राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक यांना मदत करतील, असे कोणाला वाटत नव्हते. परंतु, आ. कोरे यांनी महाडिक यांना पाठिंबा देत आपली सर्व यंत्रणा त्यांच्या मागे उभी केली. महाडिक यांच्या आघाडीसाठी त्यांनी सभाही घेतली. या सभांमध्ये त्यांनी आ. पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीवेळी राजाराम कारखान्यासाठी दिलेल्या शब्दाची आठवण करून देत विश्वासघात केल्याचा आरोप केला. पाटील यांच्यावर असा आरोप कधी यापूर्वी झाला नव्हता. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये पडद्यामागे घडामोडी घडलेल्या चर्चा समोर आल्या. आ. कोरे यांचे हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांत वर्चस्व आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत महाडिक यांना झाला.

आ. कोरे यांच्याबरोबर आ. प्रकाश आवाडे हे देखील भाजपसोबत आहेत. त्यांनीदेखील यावेळी महाडिक यांच्या बाजूने आपली यंत्रणा उभी केली. हातकणंगले तालुक्यात महाडिक यांचेही वर्चस्व आहे आणि याच तालुक्यात मतदारांची संख्या अधिक आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेना शिंदे गट सत्तेमध्ये आहे. शिंदे गटाचे आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व खासदार धैर्यशील माने यांनीही या निवडणुकीत महाडिक यांना मदत केली. आ. सतेज पाटील मात्र एकाकी पडले. त्यांच्यासोबत काँग्रेसचेच केवळ आमदार होते, तरीदेखील प्रचाराचा त्यांनी धुरळा उडविला होता.

उसाला दोनशे रुपये भाव कमी मिळाला, हा ऊस उत्पादकांबाबत एकमेव त्यांच्या प्रचारातील मुद्दा होता. एवढा मुद्दा सोडला, तर आ. पाटील यांनी महाडिक यांच्यावरच टोकाची टीका केली. याच्या उलट माजी आ. अमल महाडिक मात्र संयम, शांततेने ऊस उत्पादकांपुढे आपली भूमिका मांडत होते. आ. पाटील यांचे आरोप कसे खोटे आहेत, हे सांगत होते. दुसरीकडे खा. धनंजय महाडिक व शौमिका महाडिक मात्र आक्रमकपणे त्याच भाषेत उत्तर देत आ. पाटील यांना घेरले होते. या निवडणुकीत कोणतीही कसर राहू नये, याची काळजी महाडिक गटाने पुरेपूर घेतली. आ. पाटील यांच्या चालींवर ते बारकाईन लक्ष ठेवून होते. त्याचा फायदा या निवडणुकीत त्यांना झाला.

आ. पाटील यांच्या बालेकिल्ल्यात महाडिक गटाला 34 टक्के मते

कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यात आ. पाटील यांनी चंद्रदीप नरके यांना मदत केली होती. परंतु, नरके मात्र उघडपणे त्यांच्यासोबत कोठे प्रचारात दिसले नाहीत. महाडिक यांच्या पुलाची शिरोली या बालेकिल्ल्यात 707 पैकी आ. पाटील गटाला 127 मते मिळाली. त्याची टक्केवारी 17 आहे. आ. पाटील यांच्या कसबा बावडा या बालेकिल्ल्यात 919 पैकी महाडिक गटाला मिळालेली 309 मते (34 टक्के) आ. पाटील यांना अंतर्मुख होऊन विचार करावयास लावणारी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT