कसबा बावडा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विरोधी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या 29 प्रमुख उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या निर्णयावर प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोमवारी (दि. 10) निर्णय देणार आहेत. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दोन्ही गटाच्या मोजक्या प्रतिनिधींना आपल्या वकिलांसह म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली. ही सुनावणी दि. 6 एप्रिल रोजी पूर्ण झाली. कारखाना व मूळ तक्रारदारांच्या वतीने वकीलांनी युक्तिवाद केला.
कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांनी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या 29 उमेदवारांना अपात्र ठरविले. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आ. सतेज पाटील यांनी 29 मार्च रोजी जाहीर केले होते. तत्पूर्वी नियमानुसार प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाद मागणे आवश्यक होते. त्यानुसार अपील दाखल करण्यात आले. त्याची सुनावणीही पूर्ण झाली.
सोमवारी याबाबत निर्णय दिला जाणार आहे. निर्णय काही लागला तरी या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला राहणार आहे. निवडणूक कार्यक्रम सुरू असल्यामुळे, यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी त्यासाठी मिळेल. दि. 12 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. गुरुवार दि. 13 रोजी चिन्हासह उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.