राज ठाकरे 
Latest

राज ठाकरेंकडून अजित पवारांची नक्कल करत टीका; म्हणाले…

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : "भाजपने दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा आपला पक्ष उभा करायला शिकावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० हजार कोटींच्या आरोपानंतर हे टुणकन इकडे आले," अशी टीका राज ठाकरे यांनी अजित पवारांची नक्कल करत केली. चांद्रयान जे चंद्रावर सोडलं आहे त्याचा आपल्याला काय उपयोग आहे, तिथले खड्डे बघायचे आहेत तर तेच महाराष्ट्रावर सोडले असते तर खर्च वाचला असता, अशा शब्दात त्यांनी खड्ड्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला. पनवेलमध्ये आज (दि.१६) मनसेचा निर्धार मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.

'अजित पवार खोटं बोलतात'

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात सत्तेत गेलो कारण महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. कशाला खोटं बोलता. पंतप्रधानांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आणि ते भाजपसोबत गेले. मंत्री छगन भुजबळांनी पण सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. ते म्हणाले असतील जेल पेक्षा भाजपकडे गेलेलं बरं, अशी टीका राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केली.

'चांद्रयान महाराष्ट्रात पाठवलं असतं तर खर्च वाचला असता'

चांद्रयान चंद्रावर गेल आहे त्याचा आपल्याला काय उपयोग आहे. तिथले खड्डेच पाहायचे आहेत तर महाराष्ट्रात पाठवा, इथे खड्डे पण दिसले असते आणि खर्च पण वाचला असता. रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्न राज्याचा आहे. चांद्रयान होऊ शकतं पण महाराष्ट्रात चांगले रस्ते का होऊ शकत नाहीत? महाराष्ट्रातल्या लोकांचे या रस्त्यानी हाल केले आहेत. काय चाललं आहे महाराष्ट्राचं? २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं. त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

'खोके-खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर'

आधी नाणार मग बारसूच्या प्रकल्पाच्या नावाखाली, कोकणी माणसाच्या जमिनी कोणी बळकवल्या? याचा शोध घेतलाच पाहिजे. जे आज खोके-खोके ओरडत आहेत, त्यांच्याकडे कंटेनर आहेत. त्यांनी कोविड पण सोडला नाही. आणि निवडणुकीच्या वेळेस हे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने भावनिक करून मतं मागणार, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

आत्तापर्यंत मुंबई- गोवा महामार्गावर १५,६६६ कोटी रुपये खर्च झाला आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. असं आंदोलन करा की यापुढे रस्ते करताना सरकारमध्ये दहशत निर्माण व्हावी, असे आदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT