Latest

राज ठाकरेंच्या उत्तर सभेचा ‘भोंगा’ कोणावर आदळणार ? मनसेच्या वातावरण निर्मितीने चर्चा शिगेला !

backup backup

ठाणे; पुढारी ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 12 एप्रिल रोजी होणार्‍या ठाण्यातील उत्तर सभेची उत्सुकता शिगेला पोहचली असून मुलुंड चेक नाका ते सभा स्थळापर्यंत रॅली काढून जंगी स्वागत केले जाणार आहे. या सभेत ठाकरे हे कुणाची उत्तर क्रिया घालणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा फेटाळण्यात आलेला अटक पूर्व जामीन यावर काय बोलणार, याकडेही सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटने आणखी चर्चा रंगली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्या नंतर ज्यांना "लावरे तो व्हिडीओ"ची खूप आठवण येत होती त्यांच्या साठी खास आजची #उत्तरसभा

आमदार राजू पाटील यांचेही ट्विट

मनसे आमदार राजू पाटील यांनी चलो ठाणे, उत्तर मिळणारच असे ट्विट केले आहे. यालाच उत्तर देताना राजू पाटील यांनी पाडव्याच्या दिवशी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी विविध विषयावर भाष्य केलं होतं. त्यानंतर संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते. त्याला उत्तर देण्यासाठी ही सभा भरवण्यात आली आहे.

या सभेत प्रत्येकाला उत्तर मिळणार आहे. राज साहेबांच्या काही भूमिका पूर्वीपासूनच्या आहेत. मात्र आता काही लोकांना हे वक्तव्य जिव्हारी लागले आहे. याला उत्तर देण्यासाठी ही सभा आहे अशी प्रतिक्रिया मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

ठाण्यातील सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मंगळवारी होणार्‍या ठाण्यातील सभेसाठी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच ज्या ठिकाणी सभा होणार आहे, त्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूक पोलिसांनी प्रवेश बंदी केली असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सभेस होणार्‍या गर्दीमुळे शहरात वाहतूककोंडी होऊ नये याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली आहे.

राज ठाकरे यांनी गुढी पाढव्याला केलेल्या हिंदुत्वाच्या हुंकाराचे तसेच मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा वाजविण्याचे आदेश मनसैनिक यांना दिले. त्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडणार्‍या विरोधकांचा समाचार घेण्यासाठी राज ठाकरे यांची 'उत्तरसभा' ठाण्याच्या गडकरी रंगायतनसमोरील डॉ.मूस रोड वर होत आहे. ही सभा 9 एप्रिल रोजी सभा होणार होती. मात्र पोलिसांनी गडकरी रंगायन समोरील रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. परवानगी नाट्यानंतर उद्या ही सभा होणार आहे. ठाण्यात सर्वत्र उत्तर सभा असे बॅनर लागले असून मनसेची हवा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसेची जय्यत तयारी

एवढेच नाही तर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसेची जय्यत तयारी झाली असून त्यांच्या स्वागतासाठी 200 चारचाकी आणि 1000 दुचाकीस्वारांची रॅली काढून त्यांचे मुलुंड चेकनाकाहून ठाण्यात आगमन होईल. राज ठाकरे यांच्या जाहीर सभेकडे सार्‍यांचे लक्ष लागून आहे. गडकरी रंगायतनच्या बाजूला असलेल्या तलावपाली येथील रस्त्यावर ही सभा होणार आहे.

या सभेसाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडेकोट केली असून सभास्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. नौपाडा पोलीस यांच्यासह राखीव पोलीस दल, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी नजर ठेवून राहणार आहेत.

दरम्यान, सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहरात वाहतूककोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी गडकरी रंगायतन परिसरातील सर्व मार्गांवर वाहनांना बंदी केली आहे. त्याप्रमाणे ठाणे रेल्वे स्थानकाकडून मुस चौकातून गडकरी रंगायतनकडे जाणार्‍या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून या मार्गावरून जाणार्‍या वाहनांना शिवाजी पथमार्गे जांभळी नाका येथून मार्ग पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. तर टेंभी नाका, टॉवर नाकाकडून गडकरी रंगायतनकडे येणार्‍या सर्व वाहनांना चिंतामणी चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT