Latest

अदानींच्या कंपन्यांत चिनी व्यक्तीची गुंतवणूक; राहुल गांधींचा गौप्यस्फोट

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या परिवारातील व्यक्तींनी मॉरिशसकडे कोट्यवधी रुपये वळवले आणि ते पुन्हा अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवले, असा गौप्यस्फोट दोन आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात आणखी नवीन माहिती देत, अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला. अदानींच्या अनेक कंपन्यांत चिनी व्यक्तीने गुंतवणूक केल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. या घोटाळ्यावर मोदी गप्प का आहेत? या घोटाळ्याची चौकशी ते का करत नाहीत? असे काही प्रश्न राहुल यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत उपस्थित केले. याचवेळी त्यांनी 'जेपीसी' चौकशीची मागणीही केली.

'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी यांचे आई सोनिया गांधी यांच्यासह आगमन झाले. त्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यासह 'ग्रँड हयात'मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी 'फायनान्शियल टाइम्स', 'द गार्डियन' या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीच्या पुढे जात काही नवे गौप्यस्फोट अदानींबद्दल घडवले.

राहुल म्हणाले, या दोन्ही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी अदानी प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेतच. अदानी समूहाचे शेअर्स वधारण्यासाठी विदेशात पैसा वळवून तो पुन्हा अदानी समूहात गुंतवला गेला. या प्रकरणामागील मास्टरमाईंड दुसरा-तिसरा कुणी नसून गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी हेच आहेत. याशिवाय भारतीय पैशाला विदेशवारी घडवून तो पुन्हा अदानींकडे वळवणारे दोन लोक आहेत. एकाचे नाव आहे नासेर अली शबान अली आणि दुसरा आहे चीनचा नागरिक चँग च्युंग लिंग! भारताचे पायाभूत क्षेत्र एकहाती नियंत्रित करणार्‍या अदानी समूहाच्या बाजारमूल्याशी खेळण्याचा अधिकार या दोन विदेशी नागरिकांना दिला कुणी, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

हा राष्ट्रीय सुरक्षेचा आणि पंतप्रधानांच्या प्रतिमेचा प्रश्न असून, देशाची इज्जत इथे पणाला लागली असताना पंतप्रधान मोदी याप्रकरणी गप्प का आहेत? या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणीही राहुल गांधी यांनी केली.

त्या रकमेच्या माध्यमातून अदानी कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढवले गेले. त्या पैशांतूनच अदानी यांनी देशातील विमानतळे, बंदरे, धारावी प्रकल्प, सिमेंट कंपन्या, संरक्षण प्रकल्प आदी पायाभूत प्रकल्प मिळवले. अदानी हा जो पैसा वापरत आहेत तो कोणाचा आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

देशात जी-20 च्या शिखर संमेलनाच्या निमित्ताने जगभरातील नेते भारतात येत असताना, हे प्रकरण बाहेर आल्याने हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला असून, यावर पंतप्रधान मौन पाळून का आहेत? या एकाच व्यक्तीला पंतप्रधान संरक्षण का देत आहेत? हा पैसा कुणाचा आहे? हे देशाला समजले पाहिजे, अशी मागणी करताना अदानींचा मुद्दा उपस्थित केला की पंतप्रधान नाराज होतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

अदानींच्या कंपन्यांमध्ये सापडलेल्या 20 हजार कोटींचा मालक कोण? असा सवाल करत संसदेची संयुक्त समिती स्थापन करून त्यामार्फत चौकशी करा, या मागणीचा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही पुनरुच्चार केला.

काँग्रेस मुख्यालय टिळक भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रमेश म्हणाले, 2014 मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे 9 वी जी-20 शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी यांनी काळ्या पैशांविरोधात, काळा पैसा जमा करणार्‍यांविरोधात, मनी लाँडरिंग, काळा पैसा सफेद करणार्‍यांविरोधात, शेल कंपन्यांविरोधात आवाज उठवला होता. आता पुढील आठवड्यात 18 वे जी-20 संमेलन भारतात होत आहे. तत्पूर्वीच सर्व वर्तमानपत्रांत पंतप्रधानांचे मित्र, उद्योगपती गौतम अदानी यांनी शेल कंपन्यांचा उपयोग केला असून, 'सेबी'च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रसिद्ध झाले आहे.

तपास संस्था कुचकामी

अदानी यांच्या मैत्रीसंदर्भात काँग्रेसने मोदींना 100 प्रश्न विचारले. अदानी आपले कोण आहेत, यावर मोदींनी आपले मौन तोडावे, अशी मागणीही केली; पण त्याचे उत्तर आम्हाला मिळालेले नाही. नियमांचे उल्लंघन झाले हे सरकारला माहीत असून, देशातील तपास संस्था कुचकामी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

अदानींना क्लीन चिट देणारी व्यक्तीच 'एनडीटीव्ही'चा संचालक

'सेबी'च्या तत्कालीन अध्यक्षांनी आधी चौकशी करून अदानींना क्लीन चिट दिली. ज्यांनी क्लीन चीट दिली त्यांना अदानी समूहाची वृत्तवाहिनी असलेल्या 'एनडीटीव्ही'मध्ये संचालक म्हणून नोकरी देण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोपही राहुल गांधी यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT