Latest

Assembly Election : राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’चा निकालांवर प्रभाव नाहीच

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचा संमिश्रही म्हणता येणार नाही, एवढाच परिणाम झाल्याचे रविवारच्या निवडणूक (Assembly Election) निकालांतून दिसून आले. तेलंगणातील विकाराबादेतून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा गेली होती. हे राज्य केसीआर यांच्या बीआरएस पक्षाकडून हिसकावून घेण्यात तेवढी काँग्रेस यशस्वी ठरली. भाजपचा विचार केला असता या पक्षाच्या केसालाही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने धक्का लागलेला नाही.

राजस्थानचा विचार करता कोटा आणि अलवरमध्ये राहुल गांधींची ही यात्रा गेली होती आणि इथे काँग्रेसचेच सरकार होते. ते हातचे गेले आहे. मध्य प्रदेशातूनही यात्रा गेली होती. इथेही भाजप पुन्हा सत्तेत आला आहे. यात्रेदरम्यान इंदूरला राहुल गांधींनी उदंड कार्यक्रमही घेतले होते, याउपर इथे भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांचा वरचष्मा कायम राहिला आहे. बहुतांश जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसचे काही झाले असेल तर नुकसानच झाले आहे. गतवेळेच्या तुलनेत यावेळी विजयी उमेदवारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर रोडावली आहे. (Assembly Election)

राजस्थानातील कोटा जिल्ह्यातून 6 पैकी 4 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. अलवर जिल्ह्यातून बालकनाथ, संजय शर्मा, जसवंत यादव यांच्या रूपात भाजपने विजयाचा धडाका लावला आहे. अलवर वगळता (ही जागा काँग्रेसला गेली आहे) या जिल्ह्यातही जवळपास अशीच स्थिती आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता. ही यात्रा वाटेतील सर्व राज्ये जिंकेल, असा दावा तेव्हा काँग्रेसमधून केला जात होता. वाटेवर नसलेल्या हिमाचलमधील विजयाचे श्रेयही काँग्रेसमधून राहुल गांधींच्या यात्रेला दिले गेले होते. कर्नाटकमधील यात्रेच्या मार्गावरील सर्व जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.

30 सप्टेंबर 2022 ते 19 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राहुल गांधी यांनी 20 दिवसांत 511 किलोमीटर प्रवास केला होता. कर्नाटकमधील चामराजनगर, म्हैसूर, मांड्या, तुमकुरु, चित्रदुर्गा, बेल्लारी, रायचूरमधून ते गेले होते. या भागांतून विधानसभेच्या 51 जागा आहेत. 2018 मधील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसने येथे पटीने जागा जिंकल्या होत्या. तेलंगणा हे शेजारचे राज्य. विकाराबादवगळता भारत जोडोचा प्रवास या राज्यातून फारसा झालेला नव्हता. प्रचारात राहुल गांधींनी 40 वर सभा घेतल्या आणि केसीआर यांना टाटा बाय बाय म्हणण्यात ते यशस्वी ठरलेे; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यासमोर ते निष्प्रभच ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर प्रमुख विरोधक चेहरा म्हणून राहुल गांधींना पुढे करावे, की नाही, हा संभ्रम काँग्रेससमोर आता असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT