नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली. या राज्याला दोन भागांत विभागण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे जात नाहीत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केला. ते म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो. मी मणिपूर शब्द वापरला असला, तरी आजचे सत्य म्हणजे मणिपूर शिल्लक राहिलेलेच नाही. केंद्राच्या राजकारणाने भारतमातेची मणिपूरमध्ये हत्या केली.
या वक्तव्यानंतर भाजप नेते आणि खासदारांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला. ईशान्य भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण करण्यासाठी केवळ काँग्रेसच जबाबदार आहे. त्यामुळे राहुल यांना असे वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. राहुल म्हणाले, भारत म्हणजे नागरिकांच्या मनाचा आवाज आहे. त्या आवाजाची हत्या तुम्ही मणिपूरमध्ये केली. त्यामुळे तुम्ही देशभक्त नाही, तर देशद्रोही आहात.
राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना म्हटले की, भारतमाता आपली आई आहे, त्यामुळे आपल्याला सभागृहात बोलताना संयम बाळगायला हवा. त्याला उत्तर देत राहुल गांधी म्हणाले, मी मणिपूरमध्ये आईच्या हत्येबाबत बोलत आहे, मी आदरानेच बोलत आहे. माझी एक आई इथे बसली आहे, तर दुसर्या आईची मणिपूरमध्ये हत्या झाली आहे. हिंसाचार संपत नाही तोपर्यंत तुम्ही रोज माझ्या आईची तिथे हत्या करत आहात.
राहुल यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, मणिपूरमध्ये भारतीय लष्कर एका दिवसात हिंसाचार संपवू शकते. तथापि, केंद्र सरकारला हिंसाचार थांबवायचा नाही, म्हणून ते लष्कराचा वापर करत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
अहंकाराच्या मुद्द्यावरून त्यांनी रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांचा हवाला देऊन त्यांनी पंतप्रधान मोदी अहंकारी असल्याची टीका केली. आधी तुम्ही मणिपूरमध्ये केरोसिन टाकले आणि आग लावली. आता तुम्ही हरियाणा जाळण्याचा प्रयत्न करत आहात, असा आरोप त्यांनी केला.
माझी भारत जोडो यात्रा अजून संपलेली नाही. देश समजून घेण्यासाठी भारत जोडो यात्रा मी पुन्हा सुरू करणार आहे. यात्रा सुरू केली तेव्हा माझ्या मनात अहंकार होता. दुसर्याच दिवशी माझा अहंकार नष्ट झाला. भारत देश अहंकार नष्ट करतो. रोज मला भीती वाटायची की, मी उद्या चालू शकणार की नाही. मात्र, चालताना लाखो लोकांनी मला शक्ती दिली.
यात्रेदरम्यान एका शेतकर्याने कापसाचा गठ्ठा दिला. तो शेतकरी म्हणाला, राहुलजी, माझ्याकडे हेच राहिले आहे. बाकी काही राहिलेले नाही. मी शेतकर्याला विचारले की, विम्याचे पैसे मिळाले का? तो म्हणाला नाही. भारतातील बड्या उद्योगपतींनी ते हिसकावून घेतले. मणिपूरच्या महिलांची करुण कहाणी तिथल्या महिलांशी बोललो. एका महिलेला विचारले की, तुमच्यासोबत काय झाले? ती म्हणाली, माझा मुलगा लहान होता, एकुलता होता. त्याला माझ्या डोळ्यांसमोर गोळ्या घालण्यात आल्या. मी रात्रभर त्याच्या मृतदेहासोबत बसून राहिले; मग मी घाबरून माझे घर सोडले. मी विचारले की, घर सोडताना काही तरी आणले असेल. त्यावर ती म्हणाली, माझ्याकडे फक्त माझे कपडे आहेत आणि तिच्याजवळचा एक फोटो दाखवत म्हणाली, माझ्याकडे फक्त हीच गोष्ट उरली आहे. अन्य एक महिला माझ्याकडे आली, मी तिला विचारले, तुझ्यासोबत काय झाले? मी तिला हा प्रश्न विचारताच क्षणार्धात ती थरथरू लागली. तिच्या मनात त्या विदारक आठवणी जाग्या झाल्या आणि ती बेशुद्ध झाली.
तिथल्या महिलांशी बोललो. एका महिलेला विचारले की, तुमच्यासोबत काय झाले? ती म्हणाली, माझा मुलगा लहान होता, एकुलता होता. त्याला माझ्या डोळ्यांसमोर गोळ्या घालण्यात आल्या. मी रात्रभर त्याच्या मृतदेहासोबत बसून राहिले; मग मी घाबरून माझे घर सोडले. मी विचारले की, घर सोडताना काही तरी आणले असेल. त्यावर ती म्हणाली, माझ्याकडे फक्त माझे कपडे आहेत आणि तिच्याजवळचा एक फोटो दाखवत म्हणाली, माझ्याकडे फक्त हीच गोष्ट उरली आहे. अन्य एक महिला माझ्याकडे आली, मी तिला विचारले, तुझ्यासोबत काय झाले? मी तिला हा प्रश्न विचारताच क्षणार्धात ती थरथरू लागली. तिच्या मनात त्या विदारक आठवणी जाग्या झाल्या आणि ती बेशुद्ध झाली.