बुंदी; वृत्तसंस्था : राजस्थानमधील गोथरा (बुंदी) आणि दौसा येथे राहुल गांधी यांनी रविवारी सभा घेतल्या. 'भारत माता की जय' ही घोषणा दिली जाते, पण ज्यांची-ज्यांची ही भारत माता आहे, त्यात आदिवासी किती, गरीब किती आणि श्रीमंत किती हे कळले पाहिजे. जातनिहाय जनगणना म्हणूनच आवश्यक आहे, असे मत या सभांतून त्यांनी व्यक्त केले.
देशात गरीब किती आणि श्रीमंत किती हेच कळत नसेल तर भारत माता की जय म्हणण्यात काय अर्थ आहे, असा सवालही त्यांनी केला. देशातील मागास लोकसंख्या सुमारे 50 टक्के आहे; परंतु देश चालवण्यात त्यांची भूमिका किती, हा खरा प्रश्न आहे. देश सरकारी अधिकारी चालवतात. निवडणुका हरले, की नेते बदलतात, पण अधिकारी कधीच बदलत नाहीत. देश चालवणार्या 90 अधिकार्यांपैकी किती जण ओबीसी, दलित आणि आदिवासी आहेत, असा प्रश्न मी म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला होता. त्यांनी काही उत्तर दिले नाही. ते एकटेच ओबीसी असून काय उपयोग, असेही राहुल गांधी म्हणाले.
मोदींनी आपल्या उद्योगपती मित्रांचे 14 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे, असा आरोप त्यांनी केला. जात जनगणना राहुल गांधी आणि काँग्रेसच करू शकते, असा दावाही त्यांनी केला.