वाडा : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने सर्वत्र पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील बैल बाजारही गजबजू लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या बैल खरेदी विक्री बाजारात पुन्हा एकदा लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे पश्चिम भागातील वाडा येथील शेतकरी अक्षय मुळूक, सिद्धार्थ हुंडारे यांच्या उमद्या शर्यतीच्या बैलाची तब्बल १९.४१ लाखांना विक्री झाली आहे. ही रक्कम तब्बल दोन होंडा सिटी कारच्या किमतीएवढी आहे.
वाडा (ता. खेड) येथील शेतकरी अक्षय मुळूक, सिद्धार्थ हुंडारे याच्या म्हैसूर जातीच्या राफेल बैलाने लांडेवाडी घाटात तसेच इंदोरीतील शर्यती मध्ये ही पहिला नंबर मिळवला. थापलिंग शर्यतीत घाटाचा राजा किताब मिळविला. बैलाने शर्यतीत केलेल्या या कामगिरीचे बैलगाडा प्रेमींमध्ये आकर्षण होते.
राफेल हा म्हैसूर बेरड जातीचा असून, ४ महिन्याचा असताना बैलगाडा शर्यती वर बंदी असताना निलेश घनवट यांच्या दावणीतून ऑक्टोबर २०२० मध्ये मुळुक, हुंडारे यांनी तो विकत घेतला होता, त्यावेळी त्याची किंमत ४४ हजार होती. अनेकांच्या मनात या राफेलने घर केले होते. राफेल बैलाचे देखणे रूप व दौड यामुळे बैलगाडा शौकीन त्याच्यावर खुष होते.
यापूर्वी प्रथम राफेलची १० लाखाला मागणी झाली होती, परंतु मुळूक यांनी या व्यवहाराला नकार दिला. त्यानंतर पै. संकेतशेठ आहेर बैलगाडा संघटना (चिखली) व कै. सहादू मामा काळोखे बैलगाडा संघटना (देहूगाव) यांनी तब्बल १९.४१ लाख रूपये देऊन या बैलाची खरेदी केली आहे.