पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) दिल्ली कसोटीत आणखी तीन विकेट घेतल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये एक खास टप्पा गाठेल. नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात तीन, तर दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या आणि अशा प्रकारे त्याने या सामन्यात भारताकडून सर्वाधिक आठ विकेट्स घेतल्या. आता 17 फेब्रुवारीपासून खेळल्या जाणा-या दुस-या सामन्यात अश्विनने आणखी तीन विकेट घेतल्या, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत करिअरमध्ये त्याचे 100 बळी पूर्ण होतील.
याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणारा अश्विन अनिल कुंबळेनंतरचा (Anil Kumble) दुसरा भारतीय गोलंदाज ठरेल. कुंबळेने कांगारूंविरुद्धच्या 20 कसोटींच्या 38 डावांत 111 विकेट घेतल्या आहेत. तर अश्विनने (R Ashwin) 19 सामन्यांच्या 36 डावात 97 फलंदाजांना तंबूत पाठवले आहे. या यादीत हरभजन सिंग तिस-या स्थानी आहे. त्याने 18 कसोटींच्या 35 डावात 95 बळी पटकावले आहेत. एकूणच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम इंग्लंडचे माजी अष्टपैलू इऑन बॉथम यांच्या नावावर आहे. त्यांनी कांगारूंविरुद्ध 36 कसोटींच्या 66 डावांमध्ये 148 बळी घेतले आहेत.
फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पाच महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने नागपूरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली. जडेजाने सामन्यात 7 विकेट घेण्याव्यतिरिक्त 70 धावा केल्या, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
जडेजा हा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याच्याकडे स्वतःच्या जोरावर सामने फिरवण्याची क्षमता आहे. त्याने अनेक प्रसंगी स्वत:ला सिद्धही केले आहे. पण कसोटीत जडेजाला अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनची (R Ashwin) साथ मिळाल्यावर दोघांची जोडी प्रतिस्पर्धी संघासाठी आणखीनच धोकादायक बनते. जडेजाने 2012 मध्ये कसोटी पदार्पण केले तर अश्विनने 2011 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. दोघेही कसोटी संघाचे महत्त्वाचे सदस्य आहेत आणि त्यांनी भारताला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.
जडेजा आणि अश्विनला भारतीय मैदानांवर तोड नाही. या दोघांनी दीर्घकाळ प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजवले आहे. दोघांच्या नावावर अशा विक्रमांची नोंद झाली आहे, ज्याने कांगारूंची झोप उडेल. खरेतर, जडेजाने त्याच्या कसोटी पदार्पणापासूनच अश्विनसोबत घरच्या मैदानावर 37 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात भारताने फक्त एक सामना गमावला आहे.