पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलनंतर एका महिन्याच्या विश्रांतीवर आहे. 12 जुलैपासून टीम इंडिया पुन्हा ॲक़्शन मोडमध्ये येणार असून रोहित सेन वेस्ट इंडिज दौ-यावर जाणार आहे. या दौ-याची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. या मालिकेव्यतिरिक्त, टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि 5 सामन्यांची टी-20 मालिका देखील खेळणार आहे.
दरम्यान, कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे, मात्र टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. भारतीय फिरकी अष्टपैलू आर अश्विनलाही (R Ashwin) वेस्ट इंडिजविरुद्ध निवडण्यात आलेल्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचे वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही अप्रतिम असे रेकॉर्ड आहे. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अश्विनने आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत गोलंदाजी किंवा फलंदाजी या दोन्ही विभागात अप्रतिम कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर तो प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळवण्याचा दावेदार आहे, पण रोहित शर्मा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवणार का? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. अश्विनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यासाठी वगळण्यात आले होते.
विंडिजमध्ये अश्विनने (R Ashwin) खालच्या क्रमाने फलंदाजी करताना 50.12 च्या सरासरीने 12 डावांत 4 शतकांसह 552 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीतही तो खूप यशस्वी ठरला आहे. त्याने कॅरेबियन संघाविरुद्ध 21 डावांत 60 विकेट्स घेतल्या आहेत. विंडिजमध्ये आतापर्यंत 4 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 17 बळी घेण्यात यशस्वी झाला आहे.
अश्विनने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत 92 सामन्यांमध्ये 3129 धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतकांचा समावेश आहे. यातील 4 शतके तर त्याने एकट्या वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावली आहेत. कसोटीतील त्याची सर्वोत्तम खेळी 124 आहे आणि गोलंदाजीतील त्याची सर्वोत्तम कामगिरी एका सामन्यात 140 धावांत 13 अशी आहे. अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या 92 कसोटी सामन्यांमध्ये 474 बळी घेतले आहेत.